
लोअर परळच्या डिलाईल ब्रिजचे काम पूर्ण असूनही फक्त मिंधे-भाजप सरकारचा अहंकार तृप्त करण्यासाठी पुलाचं उद्घाटन रखडवणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. यापूर्वी रहिवाशांची गैरसोय थांबवण्यासाठी हा पूल तातडीने सुरू करा, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी पालिकेला दिले होते. त्यानंतर 10 नोव्हेंबरपर्यंत हा पूल सुरू होईल, असं आश्वासनही पालिकेकडून देण्यात आलं. मात्र, या मुदतीला 10 दिवस उलटूनही अद्याप पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं नाही.
त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून पालिका प्रशासन आणि एमएमआरडीए प्राधिकरणावर टीका केली आहे. पालिका प्रशासनाला उद्देशून त्यांनी मिंधे-भाजप सरकारचा अहंकार तृप्त करण्यासाठी तुम्ही बंद केलेला डिलाईल रोड पूल उघडा. हा पूल 15 दिवसांपासून तयार आहे आणि तुम्ही व्हीआयपी उद्घाटनाची वाट पाहत आहात, अशी टीका केली आहे.
नमस्कार! @mybmc कृपया मिंधे-भाजप सरकारचा अहंकार तृप्त करण्यासाठी तुम्ही बंद केलेला डिलाईल रोड पूल उघडा. हा पूल १५ दिवसांपासून तयार आहे आणि तुम्ही व्हीआयपी उद्घाटनाची वाट पाहत आहात.@MMRDAOfficial मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बरोबरही तेच करतंय. डिसेंबरच्या शेवटी तुमचे मंत्री उपलब्ध…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 21, 2023
तसंच एमएमआरडीएवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एमएमआरडीए मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बरोबरही तेच करतंय. डिसेंबरच्या शेवटी तुमचे मंत्री उपलब्ध असतील तेव्हा तुमचा अहंकार तृप्ततेचा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता. आता मात्र हेतुपुरस्सर ठेवलेले 5% शिल्लक काम पूर्ण करा आणि ट्रान्स हार्बर लिंक लोकांच्या वापरण्यासाठी खुला करा! डिलाईल रोड पूल आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक दोन्ही तयार आहेत, परंतु केवळ मिंधे- भाजपच्या मंत्र्यांना मुंबईसाठी वेळ नसल्यामुळे उद्घाटनं रखडत ठेवण्यात आली आहेत. अशा घटनाबाह्य सरकारी कारभाराची लाज वाटते, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.