महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढणार व महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पळवून लावणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी पुढारी समिट मध्ये बोलताना त्यांनी भाजप व मिंधे सरकारवर निशाणा साधला. ”भाजप
”आपल्या देशात सध्या दोन मोठी आव्हानं आहेत. एक बेरोजगारी व दुसरं पर्यावरण बदल. बेरोजगारी हे खूप मोठं आव्हान आहे. माझ्या आजोबांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा नोकऱ्या होत्या पण आपल्या भूमीपुत्रांना मिळत नव्हत्या. आज नोकऱ्यांच्या संध्या नाहीत. एकही नवीन उद्योग गेल्या दोन वर्षात आलेला नाही. जे उद्योग आहेत त्यांच्यावरही धाडी मारून त्यांना इथून पळवलं जातंय. दुसरं मोठं संकट सध्या आहे ते पर्यावरण बदलाचं कधी अवकाळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस, दुष्काळ, ओला दुष्काळ हे सर्व वातावरण बदलामुळे होतंय. यासाठी हे सरकार काय करतंय. महाविकास आघाडीचे सरकार असताना एकही जातीय वाद दिसले नाहीत. आमच्या कोव्हिड मॅनेजमेंटचं कौतुक केलं गेलं. कृषी क्षेत्रात आम्ही कर्ज मुक्ती केली. कुठेही दोन तीन रुपयांचे चेक शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. उद्योग क्षेत्रातही आम्ही साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आम्ही आणली. त्या उलट आमच्याकडून सरकार चोरून घेणाऱ्यांना दोन वर्षात एकही उद्योग आलेलं नाही. आपल्याकडे 20 वर्षापूर्वी स्वदेश पिक्चर आला होता. त्या पिक्चरमध्ये देशाची जी परिस्थिती दाखवली होती. ती परिस्थिती अजूनही सुधारली नाही. उलट अजून बिकट झाली आहे”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे यांनी त्यावरून मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे.”गेल्या कित्येत वर्षात असा पुतळा पडल्याचे ऐकण्यात आलेले नाही. काल एका पेपरला वाचलं की जेजेचे डीन म्हणत होते की तिथे परवानगी फक्त सहा फूटाच्या पुतळ्याला होती पण प्रत्यक्षात 35 फूटाचा पुतळा बांधला. आणि तो पुतळा पाहिला तरी ते महाराज वाटत देखील नव्हते. काहीच योग्य प्रकारे केले नव्हते. मोदीजी येणार म्हणून घाई घाईत काहीही लावून टाकायचं आणि उद्घाटन करायचं असं काम या मिंधे भाजप सरकारने केलेलं. तिथले स्थानिक सांगत होते की मोदीजी येणार म्हणून जे हेलिपॅड बांधले गेले त्याचे टेंडर दोन दिवसात काढले गेले. म्हणजे त्या उद्घाटन सोहळ्यातही घोटाळे आहेत. तिथेही पैसे काढले गेले आहेत. तसंच जून महिन्यात पीडब्ल्यूडीने एक पत्र पाठवलं की रिपेअर करायला हवा. सहा महिन्यातच त्या पुतळ्याची दुरुस्ती करावी लागली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पक्षात झालेल्या गद्दारीविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘ज्या नेत्याने 22- 25 वर्ष तुम्हाला सर्व काही दिलं. तुम्हाला आमदाराकी, खासदारकीची तिकीटं दिली. कुठल्याही मुख्यमंत्र्याने दुसऱ्याला दिलं नाही असं नगर विकास खातं उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला दिलं. तरी तुम्ही ओरबाडत गेलात. ते ही केव्हा जेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रीया झालेली होती. त्या परिस्थितीत तुम्ही त्यांना सोडून गेलात याला माणूसकी म्हणतात का? त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरला, माझ्या आजोबांचा फोटो लावतायत आणि आम्हालाच नाव ठेवता. स्वत:चं कर्तृत्व काही नाही आणि चोरीचा माल घेऊन फिरायचं हेच माहित आहे यांना. पण एक आहे ते मागून वार करतात तेव्हाच आम्ही पुढे जातोय”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे शस्त्रक्रीयेतून बाहेर पडलेले तेव्हा हा निर्लज्जपणा झाला. उपमुख्यमंत्री म्हणतात मी बदला घेतला. ही बदल्याची भावना महाराष्ट्रात कधी नव्हती. एवढं घाणेरडं नीच राजकारण भाजप व देवेंद्रजींनी केलं आहे. परवा मिंधे गटाचे वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला म्हणाले की अशा बातम्या देतेयस जसं की तुझ्यावरच बलात्कार झाला आहे. ही त्यांची मेंटॅलिटी आहे. हे जे बोलले ती या भाजपची वृत्ती आहे. ही भाजपसोबत गेलेली लोकं आता या वृत्तीची झाली आहेत आता हे मिंधे नाहीत तर ही भाजचीच वृत्ती झाले आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हमाले.
”कपडे चोरून नेले की ते चोराचे होत नाही. तसेच चोरांनो खरी शिवसेना तुमची कधी होणार नाहीच. यांनी काय खर्च केलाय, काय घोटाळे केलेयत ते आमचे सरकार आल्यावर दाखवू. कारवाई काय असते ते दाखवू. रस्ते घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिनचा घोटाळा, कचऱ्याचा घोटाळा. यातलं एकतरी काम मुंबई महाराष्ट्रात कुठेही झालेले दाखवा. जगातला सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप. जास्तीत जास्त मेंबर असणारा भाजप. पैसा आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत. ईडी सीबीआय आहेच. तरी भाजप महाराष्ट्रात नऊ वर आहे. एवढे नेते, खासदार, आमदार आमचे पळवले तरी आम्ही देखील नऊ वर आहोत”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”काँग्रेसच्या वचननाम्यातून यांनी लाडकी बहिण योजना चोरली. भाजपने 2014 ला 15 लाख देणार सांगितले. 2014 ला 15 लाख वर बोलणारे आता 1500 वर आलेले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की संजय गांधी निराधार योजनेत हे काही महिलांना टाकणार आहेत. 1500 रुपये देऊन महिलांना आपल्या बाजूने वळवायचं. लाडकी बहिण यांना आता आठवतंय. यांचं प्लानिंग फक्त नोव्हेंबरपर्यंतचच आहे. 1500 मध्ये तुम्ही काय घेऊ शकता? लाडकी बहिण योजना चालवतात पण या सरकारमध्ये महिलांचा अपमान करणारे मंत्री आहेत. सुप्रिया सुळे यांना घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. त्यांना यांनी मंत्रीपद दिलं. तेव्हा लाडकी बहिण आठवली नव्हती. दुसऱ्या एका मंत्र्यांवर घाणेरडे आरोप झाले होते. आम्ही त्यांची हकालपट्टी केलेली. भाजपच त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आरोप करत होती. आता भाजपवाले सेटल झाले आहेत. बिल्कीस बानो या महिलेवर बाल्ताकर होताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला चिरडून मारलं. तिच्या बलात्काऱ्य़ांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेप ठोठावली. त्या बलात्काऱ्यांना याच भाजपने प्रचारसभेत फिरवले हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? रेवण्णाला पळून जायला मदत केली. बदलापूरमध्ये याच लाडक्या भावाने एफआयआर घ्यायची नाही म्हणून पोलिसांवर दबाव टाकला. त्या विरोधात आंदोलन करणाऱ्या तीनशे लोकांवर मात्र अवघ्या दोन मिनिटात केसेस टाकल्या. हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.