‘ही लोकं मुंबईवर राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नाही. त्यामुळे धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईच कोणाला तरी फुकटात देण्याचे काम सुरू आहे’, अशी जोरदार टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केली आहे. सोमवारी मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारवर निशाणा साधला.
”धारावीला जे काही चालले आहे, ते अतिशय भयानक आहे, भितीदायक आहे. हे फक्त मुंबई लुटण्याचेच काम नाही तर मुंबई कोणाला तरी फुकटात देण्याचे काम सुरू आहे. ही लोकं मुंबईवर राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नाही. मुंबईवर आपली पकड बसवू शकत नाही तर मग नक्की काय करायचे. म्हणून मग मुंबई अदानींच्या घशात घालायची हे या मिंधेनी ठरवले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”घटनाबाह्य मुख्यमंत्री झाल्यापासून एमएमआरडीएची लूट, पीएमआरडीची लूट, पूणे महानगर कॉर्पोरेशनची लूट असो नागपूर असो मुंबईच्या महानगरपालिकेची लूट सुरू आहे. हे सगळं घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगर विकास खात्यात येतं आणि ही लूट त्यांच्याचकडून होत आहे. या लूटीचे पैसे ते कुठे देतात, काय करतात हे त्यांनाच माहिती. पण तेच महाराष्ट्रातच्या लूटीला जबाबदार आहे, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.
मी धारावीचा टीडीआर बद्दलचा घोटाळा आपल्यासमोर आणलेला आहे. तिथे साधारणपणे एक ते दीड लाख परिवार अपात्र होणार आहेत. त्यांचा देखील एक वेगळाच घोटाळा आहे. लोकसभा निवडणुकीच्या आसपास कुर्ल्यामधील जे गद्दार आमदार आहेत त्यांनी सांगितले होते की मदर डेरीचा प्लॉट आम्ही रद्द करु आणि अदानींना देणार नाही. पण अजूनपर्यंत तो निर्णय रद्द झाला नाही. याचा अर्थ ते खोटं बोलत होते आणि त्यांच्यात तो रद्द करण्याची हिंमत नाही. कारण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर दुसरे मालक अदानी बसलेले आहेत. तसेच मिहीर कोटेचा यांनी सांगितले होते की, मुलुंडमध्ये पीएपी, पीटीसी असेल हे रद्द केले जाईल ते देखील केले नाही. या दोन्ही गोष्टी आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिले.
”गर्व्हरमेण्ट कॉलनी येथील रहिवाशांचे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज तिथे जाऊन आम्ही त्यांची भेट घेतली. आमचं सरकार असताना आम्ही त्यांना घरं देण्याचे मंजूर केले होते आणि सरकार पडल्यानंतर किंबहुना पाडल्यानंतर जो काही आम्ही निर्णय घेतला होता, त्याला या सरकारने स्थगिती दिलेली आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय की बिल्डरांना घुसविण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. पण जी मराठी माणसे आहेत, आपले स्थानिक आपले रहिवासी आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे मुंबईत राहिले आहेत, महाराष्ट्रात राहिलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा एक कार्यक्रम हे सरकार राबवत आहे. मग ते पोलीस कॅम्पात असो किंवा शासकीय वसाहतीत असो. त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी आम्ही देखील लढा देत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”काही दिवसांपूर्वी एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जी लूट सुरू आहे त्याबाबत देखील प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच जनतेला माहिती दिली. त्याच्यात मग एमएमआरडीएमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरने जी बॅंक गॅरन्टी दिली आहे ती वेस्ट इंडिजमधील सेंट ल्युशिया येथील बॅंकेची आहे, ज्याला आरबीआयची मान्यता प्राप्त नाही. त्यांच्याकडून बॅंक एमएआरडीए गॅरंटी घेत आहे. आमचं सरकार आल्यावर त्याची चौकशी आम्ही करूच व त्यात जे दोषी असतील मग ते एमएमआरडीएचे आयुक्त असतील, कुठचे अधिकारी असतील किंवा राजकीय वर्गातील लोकं असतील त्यांना आत टाकू. कारण महाराष्ट्राची लूट आम्ही सहन करणार नाही. वीस दिवसात एमएमआरडीएने एक मोठं कॉन्ट्र्रॅक्ट टेंडर काढले आहे. ते पण धक्कादायक आहे. कायद्याच्या याच्यात पाहिले तर कदाचित बसू शकतं. पण खरोखर साधारणपणे 14 हजार-15 हजार कोटीचे टेंडर हे तुम्ही वीस दिवसात काढू शकता का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि जी लूट सुरु आहे ती भयानक आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले
आजच बातमी आलेली आहे की, 40 हजार कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टरकडे या सरकारची आहे. कॉन्ट्रॅक्टर उद्यापासून आंदोलन करणार आहेत आणि हेच मी सतत सांगत आलो आहे की, गेले दोन वर्ष सांगतोय यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पैसे दिले जातात, त्यांची बिले काढली जातात, त्यांना 10 टक्के अॅडव्हान्स मोबलायजेशन दिला जातो. त्याच्यातून स्वत:चे टक्के काढतात हे. ना पुढचं काम होतं ना कॉन्ट्रक्टर ना पुढचे पेमेण्ट होते आणि म्हणून मी सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना सांगतो की, हेजे काही तुमचे वाटाघाटी सुरू आहेत सरकारबरोबर लक्षात ठेवा आमचे सरकार येत आहेत. सखोल चौकशी करु आणि ज्यांनी या महाराष्ट्राला लुटले असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि त्यांना आत टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
पुण्यात 20 हजार कोटींचे एस्केलेशन झालंय. एका बाजूला 40 हजार कोटी दिले नाहीत आणि काल पुण्यामध्ये 20 हजार कोटींचे एका रस्त्यासाठी एस्केलेशन झालेले आहे. ही सगळी उधळपट्टी आहे ती आम्हााला थांबवायला लागेल. विकास कामं आम्ही थांबवणार नाही पण ही जी काही लूट सुरु आहे ती नक्की थांबवू आणि जे काही चुकीच घडत आहे त्यावर कारवाई करू.