येत्या 5 ऑक्टोबरला मुंबई व ठाण्यातील काही कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या कामांमध्ये गायमुख ते भाईंदरदरम्यानच्या रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन देखील होणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे.
”गेल्या वर्षी 15 जानेवारीला मी एक पत्रकार परिषद घेतलेली त्यात मी घटनाबाह्य मुख्यमंत्री व त्यांची राजवट कशाप्रकारे मुंबईत साडे सहा हजार कोटींचा लूट घोटाळा करत आहे ते सांगितले होते. रस्ते काँक्रिटरणाचा विषय मांडला होता. त्यावेळी 18 जानेवारीला पंतप्रधान महाराष्ट्रात येणार होते. त्यामुळे मी पंतप्रधानांना विनंती केली होती की त्यांनी 18 जानेवारीचा त्यांचा कार्यक्रम न घेता या रस्ते घोटाळ्यांची चौकशी करावी. मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावलं व तेव्हा ते म्हणाले होते की की पुढील दोन वर्षात मुंबईच्या सर्व रस्त्याचं काँक्रिटीकरण करून दाखवू. आज दोन वर्ष होत आली त्या गोष्टीला व गेल्या दोन वर्षात फक्त नऊ टक्के काँक्रिटीकरणाचं काम झालेलं आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”हे मिंधे सरकार अशा अनेक अर्धवट कामांचे भूमीपूजन पंतप्रधानांना बोलावून करत असतात मात्र नंतर ती कामं पूर्ण करत नाही. त्या कामांना काही अर्थ नसतो. भाजप मिंधे त्यातून खोके काढत असतील. पाच तारखेला पुन्हा या मिंधेंनी पंतप्रधानांना बोलावले आहे. त्यात गायमुख ते भाईंदर हा जो रस्ता आहे त्याचे भूमीपूजन होणार असल्याचे समजते. चौदा हजार कोटीचं काम आहे ते. एवढ्या मोठ्या रकमेच्या कामासाठी टेंडर डॉक्युमेंट 13 सप्टेंबर 2014 ला काढलं आणि फायनल सबमिशन तारीख 3 ऑक्टोबर ठेवली आहे. चौदा हजार कोटींच्या कामासाठी कुणी शॉ़र्ट टेंडर नोटीस काढलेलं आहे का? एखादा मॅन होल, खड्डा बुजवायचा असेल, स्पीड ब्रेकरचं काम असेल अशा पाच दहा दिवसांच्या छोट्या कामांसाठी शॉर्ट टेंडर नोटीस काढल्या जातात. एवढ्या मोठ्या कामासाठी शॉर्ट टेंडर नोटीस पहिल्यांदाच या देशात काढली गेली असेल. हे कितपत योग्य आहे. 5 तारखेला त्याचे भूमीपूजनही होऊ शकेल. हे सगळं होत असताना मी पीएमओला विचारतोय की मी मागच्या वर्षीही मी सांगितलेलं की भूमीपूजन करू नका कारण अशा प्रकारात बदनामी होते ती पंतप्रधान कार्यालयाची. आधी चौकशी करा मग भूमीपूजन करा. मी हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. पालिकेतही पाहिलेलं आहे. हे शॉर्ट टेंडर नोटीस काढून तुम्ही जर भूमीपूजन करणार असाल तर त्या जागेचं सॉईल टेस्टिंग केलं आहे का, जिओ टेक्निकल, एनव्हार्यमेंटल क्लिअरन्स झालं आहे का… कॉन्ट्रॅक्टर नेमला नाही आणि भूमीपूजन करायला तुम्ही उड्या मारत आहात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
”ठाणे बोरिवलीत जे ऱस्ते टनेलचे काम केले आहे त्याच्याबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे त्यातील जो क़न्ट्रॅक्टर आहे त्याने जी बँक गॅरंटी दिली आहे. ती बँक सेंट ल्युशिया या देशाची आहे. वेस्ट इंड़िजमधल्या या देशाच्या बँकेला आरबीआयने मान्यता दिली आहे का. ज्या कामांमध्ये आर्थिक अनियमितता आहे. ज्या कामांना परवानगी मिळाली नाही त्यांचे भूमीपूजन करणे कितपत योग्य आहे. पंतप्रधान पदाची एक गरिमा असते ती राखणं गरजेचं आहे. आमच्या कडे एक घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत जे अर्ध्या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याचं उद्धाटन करतायत आणि सगळीकडे दाढी खाजवत गेम चेंजर बोलत फिरत आहेत. तुम्ही चोरलेल्या त्या मुख्यमंत्री पदाची काही इज्जत ठेवलेली नाही. अर्धवट काम झालेलं असताना, अर्धवट परवानग्या मिळालेल्या असताना तुम्ही पंतप्रधानांना बोलवता. ही उद्घाटनं झाली की त्यातील आर्थिक अनियमितते विषयी मी बोलणार आहे. आम्ही त्याची माहिती काढून ठेवली आहे. आमचं सरकार येण्याआधी मेट्रो 3 मध्ये दहा हजार कोटींचा जो खर्च झाला आहे त्याचं कुठेही उत्तर नाही. दोन अडीच वर्ष होतील हे सरकार येऊन तरी मेट्रो 3 चं काम पूर्ण झालेलं नाही. अशा ठिकाणी पंतप्रधानांना बोलावणं किती योग्य आहे. भाजपला सवय असेल अर्धवट कामांचे उद्घाटन करण्याची. 2017 ला शिवस्मारकाचं भूमीपूजन केलं अजूनही त्या कामाचा काही पत्ता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं घाई घाईत उद्घाटन केलं तो पडला. राम मंदिर, संसद भवनाला गळती लागली आहे. अशी कामं करून नक्की यांना काय साधायचं आहे. हे सगळं निवडणूकीच्या आधीच्या थापा आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला