मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी लिपिक भरती परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 9 सप्टेंबरला होणार असून त्यात बऱ्याच जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘जर या जाचक अटींमुळे भूमीपुत्र आणि युवक भडकले तर ते या उत्सवाच्या काळात आंदोलन करतील” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
”मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरती परिक्षेच्या जाचक अटींविरोधात गेले काही दिवस सातत्याने आवाज उठवूनही मिंधे राजवटीखाली चालणारी मुंबई महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर ऐन उत्सवाच्या काळात युवकांना आणि भूमीपुत्रांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करावे लागेल. कारण ह्या जाचक अटींमुळे अनेक युवक-युवतींची नोकरीची संधी हिरावून घेतली जात आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. तसेच ”बेरोजगारीच्या प्रश्नाकडे ज्यांचं लक्ष नाही, ज्यांना युवकांच्या व्यथांचं गांभीर्य नाही, त्या निष्ठूर आणि निर्लज्ज मिंधे राजवटीला जागं करायची वेळ आलीये”, असे देखील ते या ट्विटमध्ये म्हणाले.