यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी संघर्ष आणि मेहनत घेतली की यश आपल्यापासून फार लांब नसते. जागृती मंच ही सेवाभावी संस्था म्हणून वरळीचा आधार आहे. तुमचे आता रौप्य महोत्सवी वर्ष आहे. असेच कार्य करत लवकरच सुवर्ण महोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करा, असे गौरवोद्गार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जागृती मंचच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभात काढले.
मी प्रतिनिधित्व करत असलेल्या माझ्या वरळी विधानसभेत अशा प्रकारे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या जागृती मंच संस्थेने अनेक उपक्रम राबवताना विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार केल्याचे दिसून येते, लवकरच सुवर्ण महोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करा. यादरम्यानच्या काळात तुम्हाला जी मदत माझ्याकडून अपेक्षित आहे ती मदत मी सदैव तुम्हाला करेन, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतो त्याच मतदारसंघात ही संस्था कार्य करते ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद्गार खासदार अरविंद सावंत यांनी काढले. याप्रसंगी माध्यमिक शालान्त परीक्षेत 85 टक्क्यांहून अधिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत 80 टक्के गुण मिळवलेले 140 विद्यार्थी, तसेच स्पर्धा महोत्सवअंतर्गत विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नैपुण्य मिळवलेल्या जवळपास 60 स्पर्धकांचा सत्कार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
जागृती मंच आज दिमाखदारपणे रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ साजरा करत आहे, हे अभिमानास्पद आहे, असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष राम साळगावकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला शिवसेना उपनेते, आमदार सचिनभाऊ अहिर, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव विष्णू कणेरकर, चंद्रकांत गावडे, ओमकार साळगावकर, दीपक आजगेकर, अनिल जाधव, अनिल पाटकर, महादेव दोरुगडे, विश्वास पाटील, संतोष आकेरकर, कुश पाटील, अमर साळवी, गणेश तुपे, अक्षय मोरे, समृद्धी कोयंडे, सागर कारंडे, प्रीतम साळवी, मंगेश कुवेकर, संजय पाटील व समस्त महिला सदस्य शितल जाधव, सुजाता पाटकर, रुचिरा सावंत, विजया कनेरकर, शितल साळगावकर, भारती आजगेकर, पुष्पा दोरुगडे, प्रतिभा साळगावकर, युगंधरा कनेरकर यांचा मोठा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद खेडकर यांनी केले, तर महादेव दोरुगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर अभिनेता संतोष पवार लिखित, दिग्दर्शित व निर्मित नाटक ‘यदा कदाचित रिटर्न’ने या कार्यक्रमाला चार चांद लावले.