‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील 27 कलाकारांना कोरोना, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांची प्रकृती चिंताजनक

सोनी मराठी वाहिनीवरील नुकत्याच सुरू झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्य़ात या मालिकेचे शूटिंग सुरू होते. दरम्यान, या मालिकेत काम करणाऱ्य़ा ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळतेय. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून साताऱ्य़ातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

‘आई माझी काळूबाई’ ही मालिका नुकतीच सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गेल्याच आठवड्यात मालिकेतील एका गाण्याच्या शुटींगसाठी मुंबईवरून साताऱ्य़ात डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत सेटवर कोरोनाने शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे.

तातडीने उपचार केल्याने कोरोनाची लागण झालेली सेटवरील इतर मंडळी त्यातून बाहेर येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, मालिकेचे साताऱ्य़ातील शूटिंग बंद करण्यात आले असून सध्या मुंबईत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेतील एका फाईट स्किवेन्सचे शूटिंग करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या