आजही तिरंगा फडकेल!

85

प्रजासत्ताक हिंदुस्थान हे एक प्रखर स्वप्नच होते. त्या स्वप्नासाठी अनेकांनी हसत हसत बलिदान दिले. मात्र त्या बलिदानाचे मोल जणू राजकीय अराजकात नष्ट झाले. हिंदुस्थानची वाटचाल स्वातंत्र्याकडून एकाधिकारशाहीकडे, लोकशाहीकडून बजबजपुरीकडे, घटनेकडून दुर्घटनेकडे, विश्वासाकडून संशयाकडे सुरू झाल्याची टीका होत आहे. काँग्रेसचे राज्य गेले आहे. अर्थात त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय लोकांना यायला हवा. जनतेने ते अनुभवले तर आपले प्रजासत्ताक खऱया अर्थाने चिरायू राहील. दरवर्षीप्रमाणे आजही तिरंगा फडकेल, पण तो सुरक्षित आणि तेजस्वी आहे काय?

आजही तिरंगा फडकेल!

आज हिंदुस्थानचा प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे पूर्वी राष्ट्रीय सोहळे म्हणूनच पार पाडले जात. आज ते सरकारी सोहळे म्हणूनच उरकले जात असतात. हे दिवस रविवारच्या सुट्टीस जोडून आले तर लोक सहलीस निघून जातात, हा आता रीतिरिवाज बनला आहे. नेत्यांची भाषणे ऐकून टाळ्या वाजविण्यात तसा कुणाला रस राहिलेला नाही. त्यामुळे प्रजेचा सहभाग नसलेले सोहळेच पार पडत असतात व त्यातच राज्यकर्त्यांना समाधान लाभत असते. पूर्वी स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी लोकांमध्येही जे देशप्रेमाचे उत्साहाचे वातावरण दिसत असे तसेदेखील आता राहिलेले नाही. घराघरांवर तिरंगे फडकत नाहीत. लोक उत्साहाने जमून राष्ट्रीय विचार करीत नाहीत. आता स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाचे ‘आगमन’ ओळखायचे कसे? तर या दोन्ही दिवसांच्या आधी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अती सावधानतेचे इशारे गृहमंत्रालयाकडून पसरवले जातात. दिल्लीतील प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळय़ावर दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाकिस्तानातून किंवा अफगाणिस्तानातून अतिरेकी घुसल्याचे जाहीर करून लोकांच्या मनात

चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण केले जाते किंवा दोन दिवस आधीच दोन-चार लोकांना अटक करून हे लोक प्रजासत्ताक दिनाचा  सोहळा उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्लीत शस्त्रसाठ्यासह दाखल झाल्याचे प्रसिद्ध केले जाते, पण सर्व पोलिसी व सुरक्षा यंत्रणांची कडीकुलपे तोडून हे लोक दिल्लीपर्यंत पोहोचलेच कसे? याचे उत्तर ना काँग्रेस राजवटीत मिळत होते ना सध्याच्या मजबूत भाजप राजवटीत मिळत आहे. नवे राज्य येऊनही पंतप्रधान व मंत्र्यांच्या भोवतीचे सुरक्षेचे पिंजरे हटलेले नाहीत. दहशतवादी हल्ल्यांची भीती कायम आहे. मग बदलले काय ? प्रजासत्ताक देशात सध्या लोकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावाच लागत आहे व सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहेत. इतक्या वर्षांनंतरही आम्हाला देशभक्ती व राष्ट्राभिमानाचे उपदेशी डोस पाजावे लागतात व ते उपदेश या कानाने ऐकून त्या कानाने सोडत आमची प्रजा राष्ट्रीय सोहळय़ांची पर्वा न करता ‘पिकनिक’साठी निघून जाते. नव्या राजवटीचा पाया देशभक्तीवर उभा केला हे स्वीकारले तर सध्याच्या वातावरणास जबाबदार कोण? ९ऑगस्टचा क्रांतिदिन असो, १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन असो, नाहीतर आजचा प्रजासत्ताक दिन, शासकीय सोहळ्यात जनतेचा सहभाग कमी सरकारी कर्मचारीच जास्त उभे केलेले असतात. अनेकदा कडाक्याच्या थंडीत शाळकरी मुलांना आणून गर्दी केली जाते. सर्वत्र साध्या वेशातील पोलीस व स्टेनगनधारी कमांडोज उभे असतात. जो लढा इंग्रजांना ‘भारत छोडो’ सांगण्यासाठी केला त्या लढय़ातील ‘प्रजा’ आता गायब झाली आहे. गुलामी, गरिबी, महागाईला ‘चले जाव’ सांगण्यासाठी लढा झाला खरा, पण तरीही हे सर्व राक्षस कायम राहिले आहेत आणि गरीबांच्या छाताडावर ते आजही उभेच आहेत. प्रजासत्ताक देशात प्रजेला स्वतःचीच कमाई बँकांतून काढता येत नाही व कमाई-कष्टाचा पैसा बाळगणाऱ्यांना चोर-गुन्हेगार म्हणून रांगेत उभे राहावे लागते. प्रजासत्ताक हिंदुस्थान हे एक प्रखर स्वप्नच होते. त्या स्वप्नासाठी अनेकांनी हसत हसत बलिदान दिले. मात्र त्या बलिदानाचे मोल जणू राजकीय अराजकात नष्ट झाले. हिंदुस्थानची वाटचाल स्वातंत्र्याकडून एकाधिकारशाहीकडे, लोकशाहीकडून बजबजपुरीकडे, घटनेकडून दुर्घटनेकडे, विश्वासाकडून संशयाकडे सुरू झाल्याची टीका होत आहे. काँग्रेसचे राज्य गेले आहे. अर्थात त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय लोकांना यायला हवा. जनतेने ते अनुभवले तर आपले प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने चिरायू राहील. दरवर्षीप्रमाणे आजही तिरंगा फडकेल, पण तो सुरक्षित आणि तेजस्वी आहे काय?

 

 

आपली प्रतिक्रिया द्या