गोवा ‘आप’ला खिंडार, दोन प्रमुख नेते शिवसेनेत

29

सामना ऑनलाईन । मुंबई

आम आदमी पक्षा (आप) च्या दोन नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ‘आप’चे नेते आणि २०१७ विधानसभा निवडणुकीचे साखळी मतदार संघाचे उमेदवार मिलंद गावस आणि डिचोलीचे उमेदवार साईनाथ पटेकर यांनी शुक्रवारी सेना भवन मुंबई येथे गोवा प्रभारी व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत आणि गोवा राज्य प्रमुख जितेश कामत हजर होते.

‘गोव्यामध्ये पक्ष बळकट करण्याचे काम जोरात चालू आहे. सुशिक्षित आणि तडफदार तरुण उस्फूर्तपणे शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. येणार्‍या काळात सामाजिक आणि राजकीय शेत्रात सक्रीय असणारे बरेच तरुण-तरुणी शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत,’ अशी माहिती राज्य प्रमुख जितेश कामत यांनी दिली आहे. मिलिंद गावस यांना २० वर्षांचा राजकीय अनुभव असून त्यांच्याकडे पक्षातर्फे महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गोव्यातील खाण बंदीचा विषय शिवसेना खासदार राऊत यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. गोव्यातील जनतेवर यामुळे दुष्परिणाम होत असल्याचे यावेळी कामत म्हणाले. यासंदर्भात बोलताना खासदार राऊत म्हणाले की, ‘दिल्लीतील एका नामांकीत वकिलांशी याबाबत चर्चा झालेली आहे. पुढील पाऊल लवकरच उचलले जाईल.’

गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत, मिलिंद बो-हाडे, गोवा राज्यप्रमूख जितेश कामत, राज्य प्रवक्ता सौ. राखी प्रभुदेसाई नाईक, मिलिंद गावस, साईनाथ पटेकर, अमोल प्रभुगावकर यांनी सेना भवन मुंबई येथे खाणीबाबत झालेल्या चर्चेत भाग घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या