आमिरसोबत पुन्हा एकदा दिसणार ‘दंगल गर्ल’

सामना ऑनलाईन । मुंबई

‘दंगल’ या चित्रपटातून अभिनेता आमिर खानसोबत प्रसिद्धी मिळालेली नवोदित अभिनेत्री फातिमा सना शेख पुन्हा एकदा आमिरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली असून ‘यशराज फिल्म्स’ या बॅनर अंतर्गत बनणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी फातिमाची निवड करण्यात आली आहे.

आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे दोन ताकदीचे कलाकार विजय कृष्ण आचार्य लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये झळकणार असल्यामुळे या चित्रपटातून फातिमाला बरंच काही शिकायला मिळणार यात शंका नाही. फातिमाच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील भूमिकेसाठी इतरही काही अभिनेत्रींच्या नावांना प्राधान्य देण्यात आले होते. पण, सरतेशेवटी फातिमानेच यात बाजी मारली.

विजय कृष्ण आचार्य तिच्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाले, चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने या भूमिकेसाठी अचूक अभिनेत्रीची निवड करण्याची गरज होती. बऱ्याच ऑडीशन्स आणि कार्यशाळांच्या सत्रांनंतर फातिमाची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या