गुजरात, उत्तर प्रदेशसह 6 राज्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याचा ‘आप’चा निर्धार

आम आदमी पक्षाची 9वी राष्ट्रीय बैठक दिल्लीमध्ये पार पडली.  या बैठकीला आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.  या बैठकीमध्ये त्यांनी जाहीर केलं आहे की त्यांचा पक्ष येत्या दोन वर्षांत होणाऱ्या 6 राज्यातील विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. ज्या राज्यांमध्ये आपने निवडणुका लढवायचं ठरवलं आहे त्यामध्ये गोवा, उत्तर प्रदेश, गुजरातचाही समावेश आहे.

केजरीवाल यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिल्लीतील सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन आणि 26 जानेवारी रोजीचा हिंसाचार याबाबतही त्यांचे मत व्यक्त केले.  शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान झालेला हिंसाचार हा दुर्दैवी प्रकार होता मात्र शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.  दिल्लीमध्ये जो पक्ष या हिंसाचारासाठी जबाबदार आहे त्याच्याविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे असंही केजरीवाल म्हणाले आहेत.  हिंसाचार झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर झाल्या नसून त्या अजूनही कायम असल्याचं केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गेल्या 70 वर्षांपासून सगळे पक्ष मिळून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.  हे राजकीय पक्ष शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन देतात मात्र आजपर्यंत कोणीच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नसल्याचंही केजरीवाल यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले मात्र आजपर्यंत नोकऱ्या दिल्या नाहीत असंही केजरीवाल यांचा आरोप आहे. 25 वर्षांत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या