लोकसभा निवडणुकीसाठी आपकडून काँग्रेसला युतीसाठी शेवटची संधी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. त्यात दोन टप्प्यांतील मतदानही पार पडले आहे. परंतु राजधानीत अजून काँग्रेस आणि आपच्या युतीचा गाडा पुढे जाताना दिसत नाही. राहुल गांधी यांनी आपसाठी चार जागा सोडायला तयार आहोत परंतु आपने यु टर्न घेतला असे ट्विट केले. आता आपने काँग्रेसला अल्टिमेटम देत ही शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणाले की, “आम्ही पुन्हा काँग्रेसला एक संधी देत आहोत. काँग्रेस आणि आपची युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. आम्ही काँग्रेसला शेवटची संधी देत आहोत त्यांनी विचार करावा. पुढे काय होईल हे पाहुयाच.

दिल्लीत आप काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहे. परंतु दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शीला दिक्षित यांना ही युती मान्य नसल्याने हे घोडं अडल्याचे बोललं जातं. तसेच राहुल गांधी यांनी ट्विट करून आम्ही आपसाठी चार जागा सोडायला तयार आहोत परंतु आपने युटर्न घेतल्याची टीका केली होती. यावर केजरीवाल यांनी कुठला यु टर्न असा प्रश्न विचारला तसेच युती करण्यासाठी काँग्रेसच उत्सुक नसल्याचे म्हटले होते.