दिल्ली डायरी-‘आप’ का क्या होगा ?

345

शीख नसतानाही मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार म्हणून पंजाबात निवडणूक लढविण्याचा धाडसी निर्णय आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. आपल्या उलटसुलट विधानांमुळे गुरू ग्रंथसाहिबांबद्दल काढलेल्या कथित अनुद्गारामुळे केजरीवाल पंजाबच्या लढाईत काहीसे पिछाडीवर पडलेले आहेत. मात्र याच केजरीवालांना अधिकच जेरीस आणण्यासाठी सत्ताधाऱयांकडून जे हथकंडे वापरले जात आहेत त्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.

नोटाबंदीमुळे सामान्य माणूस उद्ध्वस्त झाला. मात्र त्यावेळी मीडियात विशेषतः वृत्तवाहिन्यांवर त्याचे प्रतिबिंब उमटले नव्हते. मीडियावर सेन्सॉरशिप लादली अशी चर्चा त्यावेळी दबक्या आवाजात झाली. आता ‘आप’ही अशाच सेन्सॉरशिपचा अनुभव घेत आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन त्यांना टीव्हीच्या पडद्यावरून नाहीसे करण्याचे मनोरंजक कारनामे राजधानीत सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांना भाजपच्या प्रवक्त्यांनी तुमच्या चर्चेत ‘आप’चे प्रवक्ते सामील होणार असतील तर आम्ही येणार नाही, आम्ही चॅनेलचा बहिष्कार करू अशी गर्भित धमकी दिल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे निवडणुकांचा मोसम सुरू असतानाही चर्चेवाल्यांच्या चौकटींमध्ये आपचा कोपरा रिकामा दिसतो आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मीडियाचा झोत’ राहणे किती महत्त्वाचे आहे हे केजरीवालांसारख्या मीडियाच्या जोरावर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या नेत्याला माहीत आहे. मात्र सरकार असलेल्या भाजपला चॅनेलवालेही दुखावू शकत नाहीत. साहजिकच ‘आप’ची गोची झाली आहे. त्यामुळेच ‘आप’ का क्या होगा, असा प्रश्न विचारला जात आहे. अर्थात नौटंकीत पीएच.डी. मिळविलेले केजरीवाल महाशय भाजपच्या या बहिष्कारसत्रावर कोणता रामबाण उपाय शोधतात हे आता पाहायचे.

आपली प्रतिक्रिया द्या