आपचे नेते सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव 42 दिवसांचा अंतरिम जामीन दिला आहे. गुरुवारी जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जैन हे गुरुवारी तिहार तुरुंगाच्या बाथरूममध्ये कोसळले, ज्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जैन यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. एकाच आठवड्यात जैन यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सोमवारी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. बाथरूममध्येच पडल्यानेच त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती, ज्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने मे 2022 मध्ये अटक केली होती. जवळपास 360 दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयातही जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जैन यांना प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार भेडसावत असून त्यांचं वजन 35 किलोने कमी झालं आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना आरामाची गरज असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. तो मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना अंतरिम जामीन मंजूर केला.