…म्हणून शिख आमदाराचा मीरा कुमार यांना मतदानास नकार

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोमवारी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या मतदानामध्ये आम आदमी पार्टीचे (आप) आमदार आणि ज्येष्ठ वकील एच. एस. फुलका यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना मतदान करणार नसल्याचे जाहीर केले आहे. याआधी आपने मीरा कुमार यांना समर्थन जाहीर केले होते, मात्र आमदाराने जाहीरपणे मिरा कुमार यांना मतदान करणार नसल्याचे सांगून आपचा जीव भांड्यात टाकला आहे.

पंजाबच्या डाखा भागातील आमदार फुलका यांनी ‘मी राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना मतदान केल्यास काँग्रेसला १९८४ शिख दंगलीतून क्लिनचीट दिल्याचा संदेश लोकांमध्ये जाईल, त्यामुळे मीरा कुमार यांना मतदान करणार नाही’, असे सांगितले. शिख दंगलीतील आरोपी असणारे जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार आजही काँग्रेसमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे, त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे असे फुलका म्हणाले. वैयक्तिक पातळीवर मी मीरा कुमार यांचा आदर करतो, मात्र त्या काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असल्याने आपण मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे फुलका यांनी सांगितले.

एच. एस. फुलका सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. फुलका यांनी नुकताच पंजाब विधानसभेच्या विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या