‘आरे’तील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम जानेवारीत पूर्ण होणार

30

सामना ऑनलाईन । मुंबई

मुसळधार पावसामुळे ‘आरे’तील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम जानेवारी २०१८च्या पहिल्या आठवडय़ातच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन पालिका अधिकाऱयांनी आज दिले. ‘आरे’तील रस्त्यांवर पडलेले खड्डे येत्या १५ दिवसांत बुजवण्यात येणार असून रहिवाशांसाठी ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यामुळे हजारो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

‘आरे’तील मुख्य रस्त्यावरील कृषी उद्योग येथील पुलाची दुरुस्ती करण्यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे ‘एक मित्र प्रतिष्ठान’तर्फे उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पालिका अधिकाऱयांची तातडीने बैठक बोलावून चर्चा केली. राज्यमंत्री वायकर यांनी याआधी कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी जाऊन पाहणीही केली आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने करावी असे आदेशही वायकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा बैठक बोलावून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

आदिवासी-झोपडीधारकांच्या घरांसाठी पाठपुरावा सुरू
‘आरे’मधील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी ३० एकर जागेवर आदिवासी व झोपडीधारकांना घरे देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. ‘आरे’तील भरधाव वाहतुकीला आळा घालण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग लावण्याचा सूचना आरटीओ अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. शिवाय युनिट क्र. ५ या ठिकाणी ब्लिकिंग लाइट्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे यावेळी वायकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या