मेट्रो कारशेडसाठी ‘वनशक्ती’ने सुचवल्या सहा पर्यायी जागा

442

आरे मेट्रो कारशेडप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या समितीला वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने एक निवेदन देऊन कारशेडसाठी  सहा पर्यायी जागा सुचवल्या आहेत. त्यात बॅकबे, कलिना, बीकेसी, महालक्ष्मी, सीप्झ आणि कांजुरमार्ग येथील जागांचा समावेश आहे. याशिवाय आरेतील झाडे तोडल्यामुळे उद्ध्वस्त झालेले तुकाराम गार्डन, छोटा कश्मीर आणि पिकनिक पॉइंट गार्डनची तातडीने डागडुजी केली जावी अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

वनशक्ती संस्थेचे संचालक स्टालिन डी. यांनी हे निवेदन दिले आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबई मेट्रो रेल महामंडळाने 62 हेक्टर जागा घेतली होती आणि तीसुद्धा इको-सेन्सिटिव्ह झोनमधील होती. त्या जमिनीवर 36 पेक्षा जास्त जातीच्या झाडांसह तीन हजारांपेक्षा जास्त झाडे होती. त्याचप्रमाणे तेथून नदीचे पात्रही जाते. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने त्या क्षेत्राचे संरक्षण करणे आवश्यक आहे असे निवेदनात म्हटले आहे.

मेट्रो कारशेडसाठी किती जागा आवश्यक आहे यासंदर्भात वनशक्ती संस्थेने संशोधन केले. कारशेडसाठी 15 हेक्टरपेक्षा जास्त जागा लागणार नाही असे संशोधनात दिसून आल्याचे या निवेदनात नमूद आहे. दिल्ली मेट्रोची कारशेड्स ही 4 हेक्टर ते 18 हेक्टर जमिनीवरच आहेत, असेही उदाहरण त्यात देण्यात आले आहे.

वनशक्तीने कारशेडसाठी सुचवलेल्या सहा पर्यायी जागांबाबतही या निवेदनात माहिती दिली आहे. बॅकबे, कलिना, बीकेसी, महालक्ष्मी, सीप्झ आणि कांजुरमार्ग या सहाही पर्यायी जागांवर जंगल किंवा झाडे नाहीत. कलिना, बीकेसी, महालक्ष्मी आणि सीप्झ येथील जागा तर तातडीने वापरता येऊ शकतात असे सांगतानाच कलिना आणि बीकेसी येथील जागा कारशेडसाठी अत्यंत योग्य असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. कांजुरमार्गच्या जागेचा पर्याय उच्च न्यायालयालाही सुचवला गेल्याची माहिती त्यात दिली आहे.

मेट्रो महामंडळाचा 21 हजार झाडे लावल्याचा दावा खोटा

मुंबई मेट्रो रेल महामंडळाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 21 हजार झाडे लावल्याचा केलेला दावा खोटा असल्याचेही वनशक्तीच्या निवेदनात म्हटले आहे. मेट्रो महामंडळाने चार हजार रोपे निष्काळजीपणे लावली आणि त्यातील 60 टक्के झाडे जगू शकलेली नाहीत असे वास्तवही त्यात मांडले आहे. आरेतील नैसर्गिक जंगल उद्ध्वस्त करून दुसरीकडे रोपे लावून झालेले नुकसान भरता येऊ शकत नाही असे त्यात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या