मुंबईत बिबट्यांचे वास्तव्य ही जगातील अद्वितीय घटना!

राजेश चुरी |  मुंबई 

आरेच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे हल्ले होत आहेतसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान आरे कॉलनीतील बिबट्यांचे वास्तव्य आणि बिबट्यांची दुनिया यावर सुनील लिमये यांच्याशी साधलेला संवाद

मुंबईसारख्या काँक्रीटच्या जंगलात आरेच्या रूपातील हिरवळ म्हणजे मुंबईचे फुफ्फुस आहे आणि आरेच्या या जंगलातील बिबट्यांचे वास्तव्य म्हणजे मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब आहे, पण गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे  हल्ले वाढले आहेत. आरेतील वाढती अतिक्रमणे अशीच चालू राहिली तर मानवबिबट्या संघर्ष वाढण्याची भीती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी व्यक्त केली.

आरेत  आठ एकरचा परिसर जंगल घोषित

मुंबईच्या मध्यवर्ती भागात आरेचा परिसर  सुमारे 16 स्क्वेअर किमी परिसरात पसरला आहे. त्यातील 8.12 एकरचा परिसर नुकताच जंगल म्हणून घोषित झाला आहे.

आरे ते राष्ट्रीय उद्यानापर्यंत संचार

आरेच्या परिसरात अंदाजे पाच ते सात प्रौढ बिबटे आहेत. त्यातील दोन ते तीन बिबट्यांचे वास्तव्य फक्त आरेच्याच परिसरात असते. मात्र उर्वरित बिबट्यांचा संचार  आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरापर्यंत असतो.

आरेत शिकार अधिक

बिबट्याच्या मादीची फिरण्याची हद्द सुमारे  5 ते 20 किमीपर्यंच्या परिसरापर्यंत असते. अर्थात ही हद्द शिकार मिळण्यावर असते. आरेच्या परिसरात शिकार मिळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे  आरेच्या परिसरातील बिबट्यांची फिरण्याची हद्द आकाराने लहान आहे. आरेच्या एखाद्या भागात या बिबट्यांचे वास्तव्य नसते. ते या परिसरात सर्वत्र फिरत असतात.

आतापर्यंत सात हल्ले

30 ऑगस्टपासून आतापर्यंत बिबट्यांनी सात जणांवर हल्ला केला आहे. अलीकडच्या काळात आठ ऑक्टोबरला बिबट्याने एकावर हल्ला केला आहे.

तीन वर्षांत हल्ल्यांमध्ये वाढ

ऑक्टोबर 2013 पासून आरे परिसरात बिबट्याचा एकही हल्ला झालेला नव्हता. 2017 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बिबट्याने हल्ला केलेला नव्हता. मात्र 2000, 2001 आणि 2002मध्ये बिबट्यांनी माणसांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली.

तर शिकार शक्य नसते

– अलीकडच्या काळात बिबट्यांनी माणसांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्या जर जखमी असेल तर त्याला त्याची नेहमीची शिकार करणे शक्य नसल्याने अशा बिबट्यांमुळे वन्य जीव संघर्ष वाढण्याची शक्यता जास्त असते.

पिंजरा लावून पकडतात

ज्या ठिकाणी बिबट्याकडून माणसावर हल्ला झाला असेल त्या भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ांच्या माध्यमातून किंवा स्थानिकांकडून लक्ष ठेवले जाते. या भागात पिंजरा लावला जातो. या पिंजऱ्य़ात कोंबडीला भक्ष्य म्हणून ठेवले जाते.

दोन बिबळे पिंजऱ्य़ात

हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाल्यानंतर पिंजरा लावून दोन बिबटे पकडण्यात आले आहेत. त्यातील एका बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

ठिपक्यांवरून ओळख

आमच्या संशोधन करणाऱ्य़ा टीमने मागील पाच वर्षांत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनीतील बिबट्यांची माहिती गोळा केली आहे. त्यांच्या अंगावरील ठिपक्यांच्या रचनेवरून त्यांची ओळख पटवली जाते. प्रत्येक बिबट्याच्या अंगावरील ठिपक्यांची रचना वेगळी असते.

बिबट्या पक्का मुंबईकर

बिबटे हे आरेच्या जंगलाचे भूषण आहे. बिबट्या हा पक्का मुंबईकर आहे. त्याने मुंबईच्या वातावरणाशी आणि शहरवासीयांशी  जुळवून घेतले आहे.  आरेच्या जंगलातील आदिवासी बांधव वाघोबा या त्यांच्या देवतेची पूजा करतात.  मुंबईसारख्या शहरात बिबट्यांचे वास्तव्य ही अतिशय अद्वितीय घटना आहे.

रेडिओ कॉलरचा फायदा

बिबट्यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर लावण्याचे पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पातील काम पूर्ण झाले आहे. त्यातून मिळालेल्या माहितीमुळे  मानव  व बिबट्यांच्या संघर्षाच्या संदर्भात फायदा झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस दुसऱ्य़ा टप्प्याचे काम सुरू होईल.

अतिक्रमणे रोखण्याची गरज

आरेतील वाढती अतिक्रमणे अशीच चालू राहिली तर संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रशासन तत्पर आहे, पण आरे ज्यांच्या सध्या ताब्यात आहे, त्या पशुसंवर्धन विभागाने जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.