‘आशा’ होणार मिनी डॉक्टर

711

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

केवळ रुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी पाठवायचे, लसीकरण करून घ्यायचे, असे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आता परीक्षा देऊन प्रथमोपचारासारखे कार्य करण्याचे पात्रता प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे आशांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, त्यांचा दर्जा निश्चितपणे वाढला आहे.

ग्रामीण आरोग्य क्षेत्रामध्ये आशा स्वयंसेविकांना महत्त्वाचे स्थान आहे. कुटुंबकल्याण कार्यक्रम, मलेरिया, हिवताप, कुष्ठरोग, डॉट्स, प्रसूती आदी कार्यक्रमात अशा स्वयंसेविकांना सहभाग द्यावा लागतो. यात रुग्णांना शोधण्यात, उपचार देण्यात आशा महत्त्वाच्या कामगिरी बजावतात. याशिवाय नवजात बालकांना घरी जाऊन त्यांची काळजी घेणे हे अतिरिक्त काम आहे. या कामाचे २५० रुपये प्रतिलाभार्थीप्रमाणे आशांना अतिरिक्त मिळतात. येत्या वर्षात या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. या विशेष कामासाठी आशांना साडेचार हजारांची विशेष किट उपलब्ध करून दिली जाते. यात औषध, वजनकाटा, साबण, चमचा, कपडा व आवश्यक साहित्य असते. रुग्णसेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांना शासनाकडून विशेष रक्कम दिली जाते. या आशा स्वयंसेविकांना एनआरएचएममार्फत अद्ययावत प्रशिक्षण देऊन पात्र ठरविले जाते.

ग्रामीण भागातील दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील २१ ते ४० वयोगटातील महिलांना यासाठी निवडले जात असून, विधवा, परित्यक्ता महिलांना प्राधान्य दिले जाते. दैनंदिन काम करून हे काम करीत असताना घर, शेती, शिक्षण व कौटुंबिक कारणांमुळे कामावर येणे जमत नाही.

अशावेळी राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन (एनआरएचएच) त्यांना कामावरून काढून टाकण्याची तरतूद होती. परंतु आता याला लगाम बसणार आहे. नोएडा येथील संस्थेतर्फेसंभाजीनगरसह राज्यातील आठ जिल्ह्यांत प्रत्येकी एक सेंटर सुरू करण्यात येणार असून, याद्वारे पात्र आशांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आशांना कायम सेवेत राहता येईल. विशेष म्हणजे नोएडाकडून आशांची परीक्षा घेतली जात असून, ती यामध्ये पात्र ठरल्यावर तिला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामुळे केवळ मानधनासाठी काम करणाऱ्या आशांचा मानही निश्चितपणे वाढणार आहे.

चार कोटींचा निधी
जिल्ह्यातील १८३३ आशा कार्यकर्तीच्या मानधनापोटी यंदा ४ कोटींचा निधी आहे. गेल्यावर्षी हा निधी अडीच कोटी होता तर २००९ साली हा आकडा केवळ २० लाख होता. दरवर्षी यामध्ये वाढ होते. आशांना कामानुसार दरमहा १८०० रुपये मानधन होते. यामध्ये वाढ झाल्यामुळे सध्या अडीच ते तीन हजार रुपये प्रतिमाह मानधन मिळते. यात अतिरिक्त कामाचे मानधन वेगळे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या