आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा मंगळवारी ४ जुलै रोजी होत आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगदगुरू संततुकाराम महाराज यांच्या पालख्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. आषाढी वारीसाठी येणाऱ्या पालख्यांना मुक्कामाच्या ठिकाणी आणि वारकरी-भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी भोसले पंढरपुरात मुक्कामी आहेत. वारकरी आणि भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कार्यरत केले आहे. डॉ. भोसले म्हणाले, यंदाच्या आषाढी वारीत वारकरी केंद्रबिंदू मानून आवश्यक सेवा सुविधा देण्यास प्रशासन आणि मंदिर समितीने प्राधान्य दिले आहे. मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेसाठी तात्पुरती पत्राशेड उभारण्यात आली आहे. या ठिकाणी ८० हजार भाविकांची सोय होणार आहे. दर्शन मंडपात हवा खेळती रहावी यासाठी नवीन पंखे आणि इतर सुरक्षेची कार्यवाही करण्यात आली आहे.

वारी कालावधीत स्वच्छता व आरोग्य सुविधेला प्राधान्य दिले असून मंदिर परिसर, दर्शन मंडप, पंढरपूर शहरात याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकाला अधिकच्या सुविधा मिळाव्यात. आषाढीवारीसाठी येणारे भाविक-वारकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सुविधा देण्यास प्रशासन सज्ज आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची खबरदारी प्रशासनामार्फत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

६५ एकर येथे वारकऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली असून या ठिकाणी हायमास्ट प्रकाश योजना, २४ तास पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणिआपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात आले आहे. ६५ एकर, पालखी मुक्काम, वाळवंटामध्ये पुरेशी शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली, असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीसांच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी शेजारील जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.