‘भंगी म्हणू नका’, आयुषमान खुरानाने केले आवाहन

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता आयुषमान खुराना याचा आगामी चित्रपट ‘आर्टिकल 15’ याची सध्या जबरदस्त चर्चा आहे. समाजातील जाती व्यवस्थेवर बोट ठेवणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आयुषमानने त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने ‘भंगी म्हणणार नाही’ (#Don’tsayBhangi) अशी शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.

या व्हिडीओत त्याने ‘बॅन ऑन भंगी’ या जनहित याचिकेवर सही करण्यास सांगतिले आहे. ‘आपण सर्व एक समान आहोत. हे माहीत असूनही आपण भेदभाव करतो. आपले संविधान पण आपल्याला असा भेदभाव करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे तुम्हीही एक शपथ घ्या. या जनहित याचिकेवर सही करा’अशी पोस्ट आयुषमानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट ‘आर्टीकल15’ हा येत्या 28 जूनला प्रदर्शित होणार आहे.