AB de Villiers पुन्हा दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणार, आयपीएलमुळे वाढला आत्मविश्वास

हिंदुस्थानात सध्या सुरू असलेल्या आयपीएलमुळे ए बी डिव्हिलीयर्सच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ झाली आहे. पहिल्या तीन लढतींमधील अव्वल दर्जाच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूमध्ये पुन्हा एकदा देशासाठी खेळण्याची उमेद निर्माण झाली आहे. दस्तुरखुद्द ए बी डिव्हिलीयर्स याने याबाबत कबुली दिली. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याचेही त्याने याप्रसंगी सांगितले. याच पार्श्वभूमीवर आता या वर्षअखेरीस हिंदुस्थानात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये ए बी डिव्हिलीयर्स नावाचे वादळ घोंघावणार हे जवळपास निश्चित आहे.

दोन सामने एकहाती फिरवले

ए बी डिव्हिलीयर्स याने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात तीनपैकी दोन सामने एकहाती फिरवले आहेत. आतापर्यंतच्या तीन लढतींमध्ये त्याने 62.50च्या सरासरीने आणि 189.39च्या स्ट्राइक रेटने 125 धावा फटकावल्या आहेत. सलामीच्या लढतीत त्याने 27 चेंडूंत 48 धावांची खेळी साकारल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवता आले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याला अपयशाचा सामना करावा लागला. पण रविवारी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत या पठ्ठय़ाने 49 चेंडूंत 78 धावांची स्पह्टक खेळी केली आणि संघाची रॉयल हॅटट्रिक साजरी केली.

मला पुन्हा खेळायचेय

रविवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत 78 धावांची खेळी साकारल्यानंतर ए बी डिव्हिलीयर्सचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी तो म्हणाला, माझ्या बॅटमधून धावा निघताहेत. माझा फिटनेसही उत्तम आहे. मला पुन्हा एकदा देशासाठी खेळायचे आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. आयपीएलच्या शेवटी मार्क बाऊचरशी संवाद साधेन, असेही त्याने यावेळी नमूद केले. दरम्यान, ए बी डिव्हिलीयर्सने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.

बाऊचर यांनी दिले होते संकेत

मार्क बाऊचर यांनी आयपीएल सुरू होण्याआधी ए बी डिव्हिलीयर्सच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. ते म्हणाले, ए बी डिव्हिलीयर्सला स्वतःला सिद्ध करायचे होते. आयपीएलमध्ये खेळून तो स्वतःच्या खेळाची अन् फिटनेसची चाचपणी करणार होता. त्याच्यासाठी संघाचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत. आमची बोलणी सुरू आहेत, असेही मार्क बाऊचर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या