पोलीस म्हणाले ‘मुल्लाची दाढी कापली, आता नीट हवा येईल’, मारहाणीची तक्रार करायला गेलेल्या वृद्धाच्या मुलाचा आरोप

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे अब्दुल समद नावाच्या एका वृद्ध मुसलमानाला मारहाण करण्यात आली होती. समद यांची दाढीही कापण्यात आली होती. या घटनेनंतर तिथे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर समद यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना असभ्यपणे वागवण्यात आल्याचं त्याच्या मुलाने आरोप केला आहे.

समद यांचा मुलगा तैय्यब सैफी याने सांगितलंय की समद हे तक्रार द्यायला गेलेले असताना त्यांना गाझियाबाद पोलीस म्हणाले की ‘मुल्लाजीची दाढी कापली गेली, काही हरकत नाही. हवा आता खेळती राहील.’ पोलिसांनी समद यांना 2 हजार रुपये देऊन तक्रार न करता परत जायला सांगितलं असा आरोपही त्यांच्या मुलाने केला आहे. दाढी कापणं, पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेलेल्याला अशी वागणूक देणं या घटना मनाला वेदना देणाऱ्या असल्याचं समद यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. समद हे ताईत बनवण्याचं काम करत नसून ते सुतारकाम करत असल्याचं त्यांच्या मुलाने म्हटलं आहे. नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

प्रकरण काय आहे?

अब्दुल समद (72 वर्षे) हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील अनूपशहर भागात वास्तव्याला आहेत. 5 जून रोजी ते नातेवाईकाला भेटायला गाझियाबादला गेले होते. रिक्षाने ते नातेवाईकाकडे जात असताना त्यांच्याच रिक्षातील 4 तरुणांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन करायला सुरुवात केली. समद यांची त्यांनी दाढी कापली आणि त्यांना जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती केली. या घटनेचं त्यांनीच व्हिडीओ चित्रीकरण केलं होतं. चित्रीकरण करत असताना रिक्षात मोठ्या आवाजात गाणं सुरू होतं. यामुळे आपल्या वडिलांना जय श्रीरामचा जयघोष करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आवाज ऐकू येत नसल्याचं समद यांच्या मुलाचं म्हणणं आहे. गाझियाबाद पोलिसांनी या घटनेबाबत ट्विट करताना म्हटलं होतं की समद हे ताईत बनवण्याचं काम करतात आणि ताईत बनवण्यावरूनच त्यांच्यासोबत हा प्रकार घडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या