अब्दुल सत्तारांनी महायुतीशी गद्दारी केली! मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी; भाजपने फोडला फटाका

जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या झालेल्या पराभवावरून भाजप आणि मिंध्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधात काम केले. सत्तार आणि त्यांच्या कम्पूने भाजपच्या विरोधात प्रचार केल्यामुळेच रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. त्यामुळे अशा गद्दाराची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सिल्लोड भाजपने केली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे विक्रमी मतांनी निवडून येतील, असे चित्र सुरुवातीला होते. मात्र नंतर राजकीय परिस्थिती बदलत गेली आणि काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी दानवे यांचा अश्वमेध रोखला. दानवे यांचा पराभव भाजपच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे. सिल्लोड भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी या पराभवाचे खापर मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर फोडले आहे. यासंदर्भात कटारिया यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात
लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी सिल्लोड येथे अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सत्तार यांनी काळे यांना निवडणुकीत मदत केल्याचे जाहीर सांगितले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी रान करत होते. सत्तार यांनी महायुतीशी गद्दारी केली आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी कमलेश कटारिया यांनी केली आहे.

भाजप आणि मिंध्यांमध्ये दुरावा
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारातून मिंधे गटाने अंग काढून घेतले होते. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात दानवे हे स्वत: मिंधे गटाचे अर्जुन खोतकर यांना भेटण्यासाठी गेले. परंतु तरीही मिंधे गटाने प्रचारापासून दूरच राहणे पसंत केले. सिल्लोडमध्येही अब्दुल सत्तार यांनी उघड उघड दानवे यांच्या विरोधात प्रचार केला. खुद्द रावसाहेब दानवे यांनीही एका मुलाखतीत याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.