एक सामान्य क्रीडा संघटक असलेल्या अभय हडप यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या सचिवपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. त्याने आपले प्रतिस्पर्धी सूरज सामत यांचा 55 मतांनी पराभव करत मुंबई क्रिकेटची सूत्रे आपल्या हातात घेतली.
वरळीच्या आदर्श नगरात असलेल्या वरळी स्पोर्ट्स क्लबच्या सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेल्या अभय हडप यांच्या क्रीडा संघटकाने आज आपल्या क्रिकेट संपर्काच्या जोरावर हिंदुस्थानच नव्हे तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंची खाण असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या सचिवपदाचे एव्हरेस्ट सर केले. गेली 35 वर्षे क्रिकेटशी संलग्न असलेल्या हडप यांनी 25 वर्षांपूर्वी वरळी स्पोर्ट्स क्लबसाठी अजित नाईक या 14 वर्षांखालील मुलांच्या व्रेकेट स्पर्धेचे आयोजन केले आणि ते आजतागायत सुरू आहे. याच स्पर्धेच्या माध्यमातून हडप नकळतपणे मुंबई क्रिकेटशी जोडले गेले आणि 25 वर्षांच्या आपल्या विनम्र आणि गालावर स्मितहास्य असलेल्या स्वभावामुळे ही अद्भुत मजल मारली.
एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि त्यांच्या गटाने अभय हडप यांच्या मागे आपली ताकद उभी केल्यामुळे त्यांचा विजय अपेक्षित मानला जात होता आणि त्यांनी तो सहज साध्यही केला. त्यांनी सूरज सामत (151) यांचा 55 धावांनी पराभव करताना 196 मते मिळवली. आज झालेल्या निवडणुकीत मतदानासाठी सचिन तेंडुलकरसह, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, जतिन परांजपे, करसन घावरी, समीर दिघे, सलील अंकोला, मिलिंद रेगे अशा दिग्गजांनीही हजेरी लावली.
स्वप्नातही विचार केला नव्हता
मी मुंबई क्रिकेट संघटनेचा कधी सचिव होईन, असा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. विशेष म्हणजे मला उभ्या आयुष्यात असे कधी स्वप्नही पडले नव्हते. मात्र माझ्या मैदान क्लबच्या सचिव आणि क्रिकेटपटूंनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, त्यामुळेच मी आज सचिव होऊ शकलोय. हा एका सामान्य माणसाचा विजय आहे. मी आजवर ज्या श्रद्धेने मुंबई क्रिकेटसाठी काम केलेय, पुढेही तसेच करीन, असे आश्वासन अभय हडप यांनी दिले.