जगाचा निरोप घेताना अभयने दिले तिघांना जीवदान!

69

सामना प्रतिनिधी । वसई

नालासोपारा पूर्व येथील एक तरुण व्यावसायिक अभय टेटे ऊर्फ ऍण्डी (३७) आता या जगात नाही. पण या तरुणाने जगाचा निरोप घेताना तीन रुग्णांना अवयवदान करून नवसंजीवनी दिली आहे. अभयच्या मृत शरीरातील हृदय, यकृत व किडनी या तीन अवयवांचे प्रतीक्षा यादीवरील रुग्णांवर तातडीने प्रत्यारोपण करण्यात आले. तर डोळ्यांचेही गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. अभयच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजापुढे अवयवदानाच्या चळवळीसाठी प्रेरणा मिळाली आहे.

नालासोपारा येथील संकेश्वर पार्क येथे राहणाऱ्या अभयला मंगळवारी दुपारी मज्जातंतूचा आघात (ब्रेन हॅमरेज) झाला. प्रकृती गंभीर असल्याने मीरारोडच्या व्होकार्ट रुग्णालयात त्याला हलवले. पण दुर्दैवाने सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले. ऍण्डीच्या मृत्यूने हादरून न जाता कुटुंबाने त्याच्या शरीरातील अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

मरावे परी….

आपल्या मृत मुलाच्या अवयवांमुळे अन्य गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळेल, या भावनेतून आईवडिलांनी हा निर्णय घेतला, असे अभयची बहीण अनुपा हिने सांगितले. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर व ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी कुटुंबीयांना अवयवदानाच्या निर्णयात मोलाची साथ दिली.

काय आहे ब्रेन डेड?

अवयव प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीनुसार ब्रेन डेड अर्थात मस्तिष्क स्तंभाचा मृत्यू झाल्यास अशा रुग्णांच्या नजीकच्या नातेकाईकांची लेखी अनुमती घेऊन शरीरातील अवयव प्रत्यारोपणासाठी काढून घेता येतात. अभयचा ब्रेन डेड झाल्याचे निदान झाल्यानंतर व्होकार्ट हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. पांडुरंग रेड्डी क डॉ. सिद्धार्थ खारकर यांनी अवयवदान प्रक्रियेची माहिती कुटुंबाला दिली.

आपली प्रतिक्रिया द्या