विजय दर्डांचे निकटवर्तीय मनोज जयस्वाल यांना अटक

24

सामना प्रतिनिधी । नागपूर

माजी खासदार विजय दर्डांचे नागपुरातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे व अभिजीत ग्रुपचे अध्यक्ष उद्योजक मनोज जयस्वाल यांना प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) कोलकाता येथे अटक केली. स्टेट बॅंक, कॅनरा बॅंक, आयडीबीआयसह अनेक बॅंकांचे हजारो कोटी रुपयांची थकबाकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

मनोज जयस्वाल यांनी रस्ते विकास, उर्जा, स्टिल, खनिज उत्खनन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. नागपुरातील राजकीय नेत्यांशी उठबस असलेल्या मनोज जयस्वाल यांचे नाव अनेक प्रकरणात यापूर्वी अडकले आहे. विजय दर्डांशी त्यांचा विशेष स्नेह आहे. काही वर्षांपूर्वी कोळसा खाण घोटाळा उघडकीस आला आहे. यात मनोज जयस्वाल यांनी छत्तीसगड व झारखंडमध्ये कोलब्लॉक्‍स घेतले. या प्रकरणी विजय दर्डा, देवेंद्र दर्डांसोबत मनोज जयस्वाल सहआरोपी आहेत.

जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लिमीटेडने छत्तीसगडमध्ये कोल ब्लॉक घेतल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. मनोज जयस्वाल यांनी स्टेट बॅंक, कॅनरा बॅंक व आयडीबीआयसह जवळपास २० हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज उचलले आहे. याकर्जाची थकबाकी न झाल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. मनोज जयस्वाल यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिजीत जयस्वाल यालाही ईडीने ताब्यात घेतले आहे. काही वर्षांपूर्वी जयस्वाल यांनी विमान घेतल्याप्रकरणी नागपुरातील चर्चेचा विषय झाला होता. विमान खरेदी करणारे ते नागपुरातील पहिले उद्योजक होते. आयडीबीआयने दिलेल्या कर्जावर विमान खरेदी केले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने अखेर आयडीबीआयने या विमानाचा लिलाव करून रक्कमेची वसुली केली.

आपली प्रतिक्रिया द्या