खेड-शिवापूर टोलनाका बनावट पावती घोटाळा प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढणार-पोलीस अधीक्षक

खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहन चालकांना बनावट पावत्यांद्वारे कोट्यंवधींचा घोटाळा करून शासनाची फसवणूक करणाऱ्या 7 जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. घोटाळ्याची रक्कम सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक असून प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सुरेश प्रकाश गंगावणे (वय 25, वाई, सातारा), अक्षय तानाजी सणस (वय 22), शुभम सीताराम डोलारे (वय 19, जनता वसाहत), साई लादूराव सुतार (वय 25, कात्रज), अजय काशीनाथ चव्हाण (वय 19), संकेत जयंत गायकवाड (वय 22), अमोल धनाजी कोंडे (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विकास आण्णा शिंदे (वाई सातारा), मनोज उर्फ दादा दळवी , सतीश मरगजे आणि हेमंत साठे अशी फरार झालेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुणे सातारा बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर टोलनाका असून त्याठिकाणांहून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मागील काही महिन्यात संबंधित टोल नाक्यावरील कामगार बनावट पावत्या देऊन वाहन चालकांसह शासनाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास करून 7 जणांना अटक केली आहे.

संबंधित टोलचे काम एका खासगी कंपनीकडे आहे. त्यांच्यामार्फत शासनाला टोलचा महसूल दिला जातो. दरम्यान पोलिसांनी टोलचा रिपोर्ट काढला असून त्यानुसार दरदिवशी 3 हजार वाहने टोलनाक्यावर जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आरोपींनी 3 लाख 80 हजार बनावट पावत्या दिल्याचे उघडकीस आले आहे. दोन महिन्यात 2 कोटी 28 लाख रुपयांचा बनावट पावत्या देत टोल वसूल केला असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. बनावट पावती देत फसवणूक करण्यात आणखी कोणी सहभागी आहे याचा शोध घेतला जात असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या