अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास हायकोर्टाच्या रडारवर; शिवसेनेचे वर्चस्व खुपल्यानेच गोळीबाराचा पूर्वनियोजित कट

दहिसर, बोरिवलीतील शिवसेनेचे वर्चस्व खुपल्यानेच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचला गेला. या कटाचा तपास राजकीय दबावाखाली केला जात आहे, असा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि आरोपपत्र, आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्डस्, सीसीटीव्ही फुटेज स्वतः तपासणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांना दणका बसला आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे सोपवण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करीत अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी फौजदारी रिट याचिका केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी तेजस्वी यांच्यातर्फे अॅड. भूषण महाडिक यांनी जोरदार युक्तिवाद करीत राजकीय कारस्थान व पोलिसांवरील दबावाकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. पोलिसांतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला. खंडपीठाने तपासातील त्रुटींवर बोट ठेवत पोलिसांचे कान उपटले. तसेच आरोपपत्रासह आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्डस् (सीडीआर) व परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज पेनड्राइव्हद्वारे सोमवारपर्यंत सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला. न्यायालय स्वतः आरोपपत्र, सीडीआर व सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याने राजकीय दबावातून पोलिसांनी केलेल्या ‘लपवाछपवी’चा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

अमरेंद्र मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा का नाही?
अभिषेक यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमरेंद्र मिश्राविरुद्ध पोलिसांनी शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तथापि, हत्येचा गुन्हा का नोंदवला नाही? आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा अवधी असतो, मग पोलिसांनी घाईघाईने 60 दिवसांच्या आत आरोपपत्र का दाखल केले? आरोपपत्रासोबत सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज का जोडले नाही? घटनास्थळाच्या आवारात पाच पॅमेरे होते. त्यापैकी केवळ दोन पॅमेरे चालू असल्याचे पोलीस सांगतात. इतर पॅमेऱयांच्या बाबतीत छेडछाड झाली का? अमरेंद्र, मॉरिस, अॅडविन व मेहुलचे लोकेशन तसेच त्यांच्यातील पैशांच्या देवाणघेवाणीबाबत पोलिसांनी कुठले निष्कर्ष काढले, असा प्रश्नांचा भडीमार खंडपीठाने केला.

तेजस्वी यांच्या वकिलांचा युक्तिवाद
– अभिषेक घोसाळकर यांचे कुटुंब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सक्रिय आहे. बोरिवली, दहिसर परिसरात घोसाळकर कुटुंबीय आणि शिवसेनेचे वर्चस्व असून हे वर्चस्व खुपल्यानेच अभिषेक यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचला गेला.

– अभिषेक यांना मॉरिस नरोन्हाने स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावले. तिथे ‘फेसबुक लाईव्ह’वेळी मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळय़ा झाडल्या व नंतर त्याने आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र ‘फेसबुक लाईव्ह’वेळी तिथे तिसरा व्यक्ती होता.

– गोळीबाराची घटना घडली त्यावेळी मेहुल पारेख मॉरिसच्या कार्यालयाबाहेर होता हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. मेहुल मॉरिसचा जवळचा सहकारी होता. पोलिसांनी त्याला व दुसरा संशयित अॅडविनला अटक का केली नाही?

– मेहुलच्या आईला रुग्णालयात दाखल केले होते. आईची तब्येत ठीक नव्हती मग तो साडेतीन वाजण्याच्या सुमारास मॉरिससोबत हॉटेलमध्ये काय करीत होता?

– पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर आम्हाला केवळ दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज दाखवले. अन्य कॅमेरे सुस्थितीत नसल्याचे सांगितले. गोळीबाराची घटना घडल्यानंतर तेथील वीजपुरवठा बंद केला होता. त्यामागील गूढ उकललेले नाही.

– पोलीस तपास पूर्णपणे संशयास्पद आहे. खरे सूत्रधार अजून मोकाटच आहेत. पोलिसांकडून त्यांची पाठराखण केली जात आहे.