ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अॅप्लिकेशनकडून छळवणूक झाल्याने लेखकाची आत्महत्या, कुटुंबीयांचा दावा

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या एका बनावट अॅप्लिकेशनच्या छळवणुकीमुळे एका लेखकाने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. हिंदीतील एका प्रसिद्ध मालिकेचं लेखन करणाऱ्या या लेखकाने 27 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती.

काय झालं होतं नेमकं?

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सहलेखक म्हणून काम करणाऱ्या अभिषेक मकवाना यांनी गेल्या आठवड्यात आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांनी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अभिषेक यांचा भाऊ जेनिस आणि अन्य कुटुंबीयांना अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ लागले. त्यात अभिषेक यांनी त्यांच्या कंपनीकडून कर्जाऊ रक्कम घेतली असून ती फेडण्यासाठी जामीनदार म्हणून त्यांचं नाव नोंदवलं आहे. त्यामुळे आता ती रक्कम तुम्हाला चुकवावी लागेल अशा आशयाचं संभाषण या फोनवरून होऊ लागलं. या रकमेविषयी माहिती नसल्याने जेनिस यांनी त्या फोनवर नकार कळवला. त्यानंतर समोरून त्यांना शिवीगाळही करण्यात आली.

बनावट अॅप्लिकेशनचं जाळं

या फोनमुळे संशय येऊन जेनिस यांनी अभिषेक यांचे इमेल्स तपासले. त्यात त्यांना एका बनावट ऑनलाईन अॅप्लिकेशनविषयी माहिती मिळाली. ही अॅप्लिकेशन तब्बल 30 टक्के व्याजदराने कर्जाऊ रक्कम देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या अॅप्लिकेशनकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम परत करावी म्हणून त्यांना सतत कॉल येत होते. हे कॉल कधी बांगलादेश तर म्यानमार इथून येत होते.

या अॅप्लिकेशनविषयी त्यांनी इंटरनेटवर शोधलं असता ते बनावट असून त्यामुळे अनेकांना गंडा घातला गेल्याचंही कळलं. जेनिस यांनी त्यांच्या भावाचे बँक डिटेल्स तपासले असता या अॅप्लिकेशनतर्फे अभिषेक यांनी अर्ज न करताही काही रक्कम त्यांना पाठवण्यात येत असल्याचं जेनिस यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या गोष्टीची कल्पना कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला दिली, तेव्हा त्यांनाही असेच कॉल सातत्याने येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा या कॉल्सना बळी न पडण्याचं आवाहन जेनिस यांनी सर्वांना केलं.

या प्रकाराची माहिती मकवाना कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी मकवाना यांचे बँकेच्या व्यवहारांचे तपशील तसंच या फोन क्रमांकाचे लोकेशन आणि अन्य तपशील मागवले आहेत. त्यानंतरच या प्रकाराचा खुलासा होऊ शकतो, असं म्हटलं आहे. कारण, सध्या मकवाना कुटुंबाला सतत कॉल येत असले तरी याच कॉलमुळे अभिषेक हे आत्महत्येला प्रवृत्त झाले का, याची शहानिशा झालेली नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या