सचिनची गुगलहून जास्त माहिती त्याच्या ‘जबरा फॅन’ जवळ

323

>> ज्योत्स्ना गाडगीळ

२६ मे २०१७ हा चित्रपटसृष्टीसाठी एक अजरामर दिवस ठरणार आहे, कारण क्रिकेट जगताचा `देव’ सचिन तेंडुलकर ह्याच्या जीवनावर आधारित `सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट प्रकाशित होणार आह़े चित्रपट येण्याआधीच त्याचा मोठ्या प्रमाणात बोलबाला झाला आहे. `फस्र्ट डे, फस्र्ट शो’ बघण्याचेही अनेकांनी ठरवले आहे. पण त्या भाऊगर्दीत सचिनचा एक भक्त त्या दिवशी त्याची भक्ती आपल्या देवासमोर आणण्यासाठी धडपडत आहे. त्याचे नाव आहे, अभिषेक साटम!

`सचिन तेंडुलकर’ ह्या नावाशी निगडीत तीस हजारांहून अधिक छायाचित्रे, पंधरा हजारांहून अधिक लेख, शेकडो पुस्तके, मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रे, सचिनचे छायाचित्र असलेले पेन, बॅट, टी-शर्ट, कोकोकोला टीन, स्टीकर्स, पोस्टर्स…असा भला मोठा `सचिन’साठा अभिषेकने केला आहे. २९ वर्षांचा अभिषेक गेल्या पंधरा वर्षांपासून `सचिन’मय झाला आहे. बूमर च्युर्इंगमसोबत मिळणाऱ्या स्टीकर्सच्या साठवणीतून त्याचा छंद सुरू झाला. आता स्टीकर्सच्या बरोबरीने जमवलेल्या अन्य वस्तूंचे त्याला प्रदर्शन भरवायचे आहे. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन आपल्या दैवताच्या हातून व्हावे, अशी अभिषेकची इच्छा आहे. काही कार्यक्रमात सचिनचे जवळून दर्शन झाले, परंतु प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून न आल्याची खंत अभिषेक व्यक्त करतो. अभिषेकने हा छंद केवळ करमणूक म्हणून जोपासलेला नाही, तर त्यामागे त्याची दूरदृष्टीदेखील आहे.

`डिजिटल मीडिया येण्याच्या आधीपासून `सचिनपर्व’ सुरू झाले आहे. आज ‘गुगल’च्या एका क्लिकवर सचिनबद्दल हवी तेवढी माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ उपलब्ध होतील. परंतु तो बहरत असतानाच्या काळातील इत्थंभूत बातम्या, लेख, त्याच्या नावे काढलेले प्रोडक्ट्स गुगलकडे उपलब्ध असतीलच असे नाही. ते सगळे मी जतन केले आहेत. आपल्याकडे अशा कर्तबगार व्यक्तिंचे संग्रहालय बनवले जाते. भविष्यात सचिनच्या नावे असेच एखादे संग्रहालय काढायचे ठरले, तर त्यासाठी लागणारे बहुतांशी साहित्य माझ्या एकट्याकडे एकगठ्ठा असणार आहे. त्या संकलनाचे `कॉपीराईट्स’ माझे असतील. त्या सगळ्या गोष्टी उद्या संग्रहालयासाठी मागवण्यात आल्या तर मी राजीखुषी माझ्या नावे ती छोटीशी भेट माझ्या देवतेला अर्पण करेन.’ असे अभिषेक सांगतो.

बालवयात फोटोसंग्रहाच्या आवडीतून अभिषेकने हजारो फोटो जमवले. ते जमवत असताना, एकदा त्याची मावशी सहज त्याला म्हणाली, `एवढे फोटो जमवून प्रदर्शन भरवणार आहेस का?’ मावशीच्या त्या शब्दांनी अभिषेकला एक ध्येय मिळाले आणि त्या दिवसापासून अभिषेकने `प्रदर्शन’ भरवण्याच्या दृष्टीने सचिनचे चित्र आणि नाव, माहिती असलेल्या सर्व गोष्टींचा संग्रह सुरू केला.

abhishek-satamलालबाग येथील बीएसटी क्वार्टर्समधल्या छोट्याशा घरात छंद जोपासत असताना अभिषेकला जागेचा अडसर होत होता. पण घराला लागून असलेल्या छोट्याशा गॅलरीत त्याने आपल्या देवतेचा देव्हारा सजवला. त्यासाठी त्याने आईकडून अनेकदा बोलणीही खाल्ली, परंतु वडील कलासक्त असल्यामुळे त्यांनी अभिषेकला नेहमी प्रोत्साहन दिले. मोठी बहीण नेहानेसुद्धा वेळोवेळी मदत केली. मित्रपरिवार नेहमीच अभिषेकच्या दिमतीला असे. शालेय वयात लागलेले वेड पदव्युत्तर शिक्षण झाले तरी संपले नाही, उलट वाढतच गेले. पूर्वी त्याचे `वेड’ पाहून हसणारे लोक, आता त्याचा हेवा करू लागले आहेत. अभिषेकइतकीच इतरांनाही त्याच्या प्रदर्शनाबद्दल उत्सुकता आहे.

सचिनला आपला आदर्श मानणारा अभिषेक त्याच्या पावलावर पाऊल टाकून क्रिकेटक्षेत्रात का उतरला नाही? असे विचारले असता अभिषेक सांगतो, `एखादी व्यक्ति आपला आदर्श असेल तर त्या व्यक्तिचे अनुकरण करण्यापेक्षा त्याच्या गुणांचे अनुकरण केले पाहिजे. सचिनने क्रिकेट क्षेत्र निवडून त्यात सर्वोत्तम शिखर गाठले, तसे आपणही आपल्या क्षेत्रात मेहनतीने ‘सचिन तेंडुलकर’ होऊ शकतो. सचिन माझे दैवत आहे, त्याच्याप्रती माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. हा छंद जोपासताना सचिनबद्दल प्रत्येक गोष्ट मी अतिशय बारकाईने वाचली आहे. त्याचे यश आपल्या तीन पिढ्यांनी पाहिले आहे. त्या यशामागे असलेला त्याचा खडतर प्रवास मी वाचला आहे. त्याच्यावर होणारी टीका, त्यावर त्याचे मौन आणि आपल्या खेळातून त्याने दिलेले उत्तर ह्यासर्वांमुळे सचिनबद्दल माझ्या मनात आदरयुक्त प्रेम निर्माण झाले आणि त्याचा आदर्श ठेवून मी नेहमी डोळसपणे भक्ती केली.’

सचिनच्या जिद्दीचा आदर्श ठेवून अभिषेकने शिक्षण आणि अन्य कलाक्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले आहे. परळच्या आर.एम.भट शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर परळमधल्या महर्षी दयानंद विद्यालयात `समुद्रविज्ञान’ विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि आता काही महिन्यांतच तो डॉ. छाया पानसे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्याच विषयात पीएच.डी.साठी प्रबंध सादर करणार आहे.

निसर्गाशी त्याचे अतिशय जवळचे नाते आहे. शिवाय, फोटोग्राफीची आवड असल्याने त्याने स्वकमाईतून घेतलेल्या कॅमेऱ्याने आजवर अनेक छायाचित्रे काढली आहेत. एवढेच नाही, तर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांमधून बक्षिसेही मिळवली आहेत. त्याने कॅमेरा घेतला, त्याच वर्षी `टाइम्स ऑफ इंडिया’तर्फे घेतलेल्या छायाचित्र स्पर्धेत त्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. `लालबागच्या राजाचे मिरवणुकीतले छायाचित्र’, `समुद्रकाठी टिपलेल्या स्टारफिशच्या पाऊलखुणांचे’ छायाचित्र नामांकित छायाचित्रकारांच्या बरोबरीने पहिल्या शंभरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या छायाचित्रांव्यतिरिक्त तो सध्या प्रचलित असलेल्या `सेल्फी’च्याही प्रचंड प्रेमात आहे. फक्त त्यात थोडे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने काढलेले सेल्फी हे त्याचे एकट्याचे नसून मित्रांना सोबत घेऊन काढलेले असतात. म्हणून प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या वाढदिवसाला त्यांच्यासह काढलेल्या छायाचित्राची प्रत आणि शुभेच्छा त्याची फेसबुक वॉल सजवतात.

अभिषेकचा जनसंपर्क दांडगा आहे. मित्रपरिवार मोठा आहे, ह्या सर्वाचे फलित म्हणजे त्याला आजवर मिळत गेलेली संधी! अभिषेककडे समुद्रविज्ञानाची माहिती घेण्यास आलेल्या प्रवीण दाभोळकर ह्या पत्रकार मित्राने त्याचे ‘सचिनवेड’ वृत्तपत्रात छापून आणले. ते वाचून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही अभिषेकची दखल घेतली. वरचेवर त्याच्या मुलाखती होऊ लागल्या. गेल्या वर्षी सचिनला वाढदिवसाची भेट म्हणून अभिषेकचे मित्र गुरुप्रसाद जाधव, अभिषेक करंगुटकर, पराग सावंत, प्रथमेश अवसरे, संकल्प नलावडे ह्यांनी त्याचे सचिनवेड `जबरा फॅन’ नावाने एका गाण्यात चित्रित केले आहे. त्या गाण्यालाही हजारो ‘लाइक्स’ मिळाले.

फोटो, पुस्तके, मासिके ह्याबरोबरीने रांगोळीतूनही अभिषेकने सचिनला मानवंदना दिली आहे. बालपणापासून चित्रकला, हस्तकला चांगली येत असल्याने पोट्रेट रांगोळी, गालिचा रांगोळी, मुक्तहस्त रांगोळीतही अभिषेकचा हातखंडा आहे. `रंगोली आर्ट, परेल’ नावाचा त्यांचा रांगोळी कलाकारांचा परिवार आहे. शाळा, कॉलेजमध्ये असताना रांगोळी आणि अभिषेक हे समीकरण होतेच, परंतु तिथून बाहेर पडल्यानंतरही समारंभाच्या प्रसंगी भू-अलंकरणासाठी अभिषेकलाच पाचारण केले जाते.
सचिनची स्वाक्षरी असलेली सोन्याचा मुलामा दिलेली छोटीशी बॅट अभिषेकच्या संग्रहात आहे, तीसुद्धा रांगोळीमुळेच! `कॅनन’ कॅमेऱ्याच्या शोरूममध्ये कॅमेरा घेण्यासाठी गेलेल्या अभिषेकला दिवाळीनिमित्त काढण्यास रांगोळी सांगितले. त्याने काढलेली रांगोळी तिथल्या व्यवस्थापकांना एवढी आवडली, की त्यांनी अन्य शाखांच्या उद्घाटनाच्या वेळीही अभिषेकला रांगोळी काढायला सांगितली. त्यावेळेस सचिन कॅननचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. ग्राहकांना दिवाळीची भेट म्हणून सचिनची स्वाक्षरी असलेली छोटीशी किचेनसदृश बॅट भेट म्हणून दिली जात होती. कॅननच्या पाच शाखांमध्ये रांगोळी काढल्यामुळे अभिषेकच्या संग्रहात पाच बॅटची भर पडली.

लालबागचे प्रसिद्ध मूर्तीकार रत्नाकर कांबळी ह्यांचा मुलगा साईश कांबळी ह्याने कामानिमित्त सचिनशी झालेल्या भेटीत अभिषेकचे सचिनप्रेम कानावर घातले आणि त्याचा संग्रह दाखवला असता, सचिनने अभिषेकला शुभेच्छा देत त्याच्या नावाखाली आपली स्वाक्षरी केलेली बॅट अभिषेकसाठी पाठवून दिली. अशीच स्वाक्षरी असलेले `द मेकिंग ऑफ क्रिकेटर्स’ हे सचिनच्या भावाने लिहिलेले पुस्तक त्याला फ्लोरा फाऊंटन येथील रस्त्यावरील दुकानांत मिळाले. ते मिळवण्यासाठी अभिषेकने बरीच धडपड केली होती. जेव्हा ते हाती लागले आणि त्यावर सचिनची स्वाक्षरी पाहिली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

शालेय जीवनात `अभ्यास एके अभ्यास’ न करता अन्य गोष्टीही आत्मसात केल्या पाहिजेत, असा अभिषेकच्या बाबांचा नेहमीच आग्रह असे. त्यांच्या सांगण्यावरून पाचवीपासून त्याने `मार्शल आर्ट्स’चे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. सलग १५ वर्षे त्याचा सराव ठेवून अभिषेक `ब्लॅक बेल्ट-ग्रेड २’पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे क्रीडाक्षेत्राशीही त्याचा संबंध आला. शाळा-कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धांबरोबर `योगा’ स्पर्धेतही त्याने बक्षिसे मिळवली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या `योग’ स्पर्धेत सलग दोन वर्षे सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच क्रीडा स्पर्धांचे नेतृत्व केले आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने `मिस्टर महर्षी’, `बेस्ट आऊटस्टँडिंग स्टुडंट’, `अॅन्युअल चॅम्पिअनशिप’ असे मानाचे पुरस्कार पटकावले होते.

अशा ह्या आऊटस्टँडिंग स्टुडंटला आता आऊटस्टँडिंग काम करायचे आहे, ते म्हणजे आपले सचिनप्रेम प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचे. पुढच्या पिढीसाठी सचिन नेहमीच आदर्श राहील आणि त्याने जमवलेली माहिती सचिनच्या चाहत्यांना नक्की उपयोगी पडेल ह्याची खात्री अभिषेकला आहे. त्याचे स्वप्न साकार होण्यासाठी रवींद्र मारडिया नावाचे ‘इंटरनॅशनल क्रिएटिव्ह आर्ट’ गॅलरीचे संस्थापक अभिषेकला मदत करत आहेत. आता फक्त सचिनच्या होकार येण्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. २४ एप्रिल रोजी सचिनच्या ४४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिषेकची तपश्चर्या फळाला येवो, हीच सदिच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या