अबोलीवर काळय़ा-पिवळय़ांची दादागिरी

37

सामना ऑनलाईन । ठाणे

फक्त महिला प्रवासीच घ्या, शेअर भाडे घेता येणार नाही, स्टॅण्डवर रिक्षा लावायची नाही… या धमक्यांसह मुद्दाम ओव्हरटेक करणे, कट मारून भीती निर्माण करणे तर कधी अश्लील शेरेबाजी… पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या रिक्षा व्यवसायात दणक्यात एण्ट्री घेणाऱ्या अबोली रिक्षाचालकांना सध्या या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ठाण्यातील काही मुजोर रिक्षाचालकांना अजूनही महिलांनी रिक्षा चालवणे म्हणजे घुसखोरी वाटत असून मुद्दाम त्रास देण्याचे सत्र सुरू असल्याचा आरोप अबोली रिक्षाचालकांनी केला आहे.

शिवसेनेच्या प्रयत्नाने ठाण्यात अबोली रिक्षासेवा सुरू झाली. आरटीओने २५ महिलांना रिक्षा चालवण्याचे परमिट देऊन त्यांना बळ दिले. मात्र सुरुवातीला कुतूहलाने पाहिल्या जाणाऱ्या अबोली रिक्षाला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि काळय़ा-पिवळ्या रिक्षांच्या गर्दीत अबोली रिक्षा शहरातील रस्त्यांवरून सुसाट धावू लागली. मात्र रिक्षा व्यवसाय हा पुरुषांची मक्तेदारी समजली जात असल्यामुळे अबोली रिक्षाचालकांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करून त्यांच्या रोजीरोटीला ब्रेक लावण्याचा प्रकार काही मुजोर रिक्षाचालकांकडून सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे.

वागळे इस्टेट येथे अबोलीसाठी पहिले स्वतंत्र स्टॅण्ड तयार करण्यात आले आहे. मात्र हे स्टॅण्ड वगळता अबोली रिक्षाचालकांना इतर कोणत्याही स्टॅण्डवर रिक्षा लावण्यास अटकाव केला जातो. कॅडबरी जक्शन, गावदेवी, शिवाईनगर, शास्त्रीनगर इत्यादी ठिकाणी शेअर रिक्षा स्टॅण्ड आहेत. तेथेही रिक्षा लावण्यास पुरुष रिक्षाचालकांकडून मनाई केली जात असल्याचे अबोली रिक्षाचालक बायजाबाई बागूल यांनी सांगितले.

रिक्षा चालवताना मुद्दाम कट मारला जातो. कधी कधी तर ओव्हरटेक करत हुलकावणी दिली जाते. त्यामुळे ताबा सुटून अपघात घडण्यासारखी परिस्थिती ओढावते. अनेक वेळा स्थानक परिसरातून पुरुष प्रवाशांना अबोलीत बसवण्यास अटकाव केला जातो. अबोली महिलांसाठी आहे, फक्त महिला प्रवाशांनाच बसवण्यासाठी दमदाटीही केली जात असल्याचे योगिता आंग्रे यांनी सांगितले.

कटू अनुभव
ठाण्याच्या गाकदेकी मैदान येथील लोंढे कंपाऊंडसमोर असलेल्या शेअर रिक्षा स्टॅण्डकर काही महिन्यांपूर्वी रिक्षाचालक संतोष रोंबाडे (४२) याने सहा ते सात महिला रिक्षाचालकांना उद्देशून अश्लील शेरेबाजी केल्यानंतर रोंबाडे विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. मात्र शेरेबाजी अजूनही थांबली नसल्याचा अनुभव अनेक अबोली रिक्षाचालकांनी सांगितले. थेट शेरेबाजी होत नाही, पण अबोली रिक्षा पाहताच काही रिक्षाचालक अश्लील हावभाव करत असल्याचेही काही महिला चालकांनी सांगितले.

अबोलीची मुस्कटदाबी
अबोलीला ठाण्यात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र रिक्षा चालवताना येत असलेले कटू अनुभव आणि समस्या सोडवण्यासाठी हवे तसे बळ मिळत नाही. आरटीओला अनेक वेळा विनंतीअर्ज करण्यात आले. मात्र अबोलीची मुस्कटदाबी सुरूच आहे – अनामिका भालेराव, अबोली रिक्षा युनियन (अध्यक्षा)

आपली प्रतिक्रिया द्या