हिंदुस्थान दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी वानरही तैनात!

1370

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थान दौऱ्यासाठी उत्साहात तयारी सुरू आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकी सिक्रेट सर्व्हिसकडे असेल, तर त्यांच्या ताफ्याच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजी आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडे असेल. ट्रम्प यांच्या ताफ्यात मुंगीही शिरू शकणार अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी वानरही तैनात करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

आग्र्यातील ज्या भागातून ट्रम्प यांचा ताफा प्रवास करणार आहे. त्या भागात माकडांनी धुमाकूळ घातला आहे. या माकडांचा बंदोबस्त कसा करावा, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. त्यावर प्रशासनाने नामी युक्ती शोधली आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलेले वानरच तैनात करण्यात आले आहेत. हे वानर ट्रम्प यांच्या ताफ्यांचे परिसरातील माकडांपासून रक्षण करणार आहेत. तसेच या भागात फिरकणाऱ्या माकडांनाही ते पिटाळून लावणार आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेल्या पाच वानरांना ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा कडे तयार करण्यात आले आहे. तसेच या सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही माहिती देण्यास अधिकाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 10 तुकड्या, पीएसी, एटीएस आणि एनएसजीच्या तुकड्यांसह कमांडोही तैनात असणार आहेत. एका तुकडीत 100 जवान असणार आहेत. तसेच अमेरिकेचे एक पथक उपग्रहाद्वारे ट्रम्प यांच्या दौऱ्यावर नजर ठेवणार आहे. तसेच ट्रम्प ज्या भागातून प्रवास करतील तेथील मोबाईल सेवा बंद होणार आहेत. तसेच ट्रम्प यांच्या ताफ्यात दोन गाड्या असणार असून ते कोणत्या गाडीत आहेत, याची माहिती मोजक्याच व्यक्तींना असेल.

ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया 24 फेब्रुवारीला ताजमहालला भेट देणार आहेत. त्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या ताजमहाल भेटीच्या पार्श्वभूमीवर मुगल बादशहा शहाजहाँन आणि मुमताजच्या कबरींची प्रथमच म़डपॅक पद्धतीने स्वच्छता करण्यात आली. मुलतानी माती लावून मडपॅक पद्धतीने स्वच्छता करण्यात आल्याने कबरींवर एकही डाग दिसणार नाही. ट्रम्प यांच्या हिंदुस्थान दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी चक्क वानरच तैनात करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या