काळा पैसा म्हणजे काय?

2440

>> जयराम देवजी

ज्या उत्पन्नावर कर भरणे आहे, तो न भरलेला पैसा व लाचेच्या स्वरूपात दिलेली रक्कम याला आपण ढोबळमानाने काळा पैसा मानतो. रोखीच्या व्यवहारामुळे काळ्या पैशाची निर्मिती होते व तो निर्माण करण्यासाठी सर्वच हातभार लावतात. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, बांधकाम, इतर व्यावसायिक, प्रॉपर्टीची उलाढाल करणारे एजंट, फिल्म इंडस्ट्रीजमधील व पर्यटनाचा व्यवसाय करणारे, बिलाशिवाय व्यापार करणारे व्यापारी, क्रिकेट क्षेत्र व त्या क्षेत्रातील इतर, स्मगलर, राजकीय पक्ष, नेते इत्यादींचा समावेश करावा लागेल.

देशहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिल्याने त्याच्याकडून सर्व घडत असते. रोखीच्या व्यवहारामुळेच त्यांना ही संधी मिळते. रोखीच्या व्यवहाराची कुठेच नोंद नसल्यामुळे ते हिशेबात येत नाहीत. त्यामुळे त्यावर कर भरला जात नाही. लाचलुचपतीचे व्यवहार वाढतात. हा काळा पैसा अर्थव्यवस्थेला मारक ठरतो व पुढे काही प्रमाणात चलनात येतो. आर्थिक शिस्त राहत नाही. काळ्या पैशांची समांतर अर्थव्यवस्था तयार होते. याच काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून नक्षलवादी, दहशतवादी पोसले जातात. नोटाबंदीच्या निर्णयामुळे या सगळ्यांना तडाखा बसला आहे. सरकारने आधी स्वेच्छा उत्पन्न जाहीर करण्याची योजना देऊन काळा पैसा बाळगणार्‍यांना कर भरून उत्पन्न जाहीर करण्याची संधी दिली होती. परंतु या योजनेला तेवढासा प्रतिसाद मिळाला नसल्याने गुप्तता बाळगून ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या.

अर्थात सरकारने पूर्ण खबरदारी न घेता घाईने घेतलेल्या निर्णयामुळे बर्‍याच निष्पाप लोकांना अडचणींना सामोरे जावे लागले. काहींना तर प्राणही गमवावे लागले. चलनातून १५ लाख कोटींच्या नोटा रद्द झाल्याने नवीन नोटा चलनात येऊन अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास कमीत कमी सहा ते सात महिने लागतील यात दुमत नाही. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता, बँकांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे लोकांना अर्थसहाय्यासाठी खासगी सावकाराच्या दारात उभे राहावे लागते. हे सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण नव्हे.

आपली प्रतिक्रिया द्या