भटकेगिरी : अजिंक्य…. अभेद्य…

 

>> द्वारकानाथ संझगिरी ([email protected])

शाळेच्या इतिहासात मेवाडच्या ‘राणा संगा’ची ओळख अंगावर अनेक जखमा मिरवत लढणारा योद्धा अशी होती. त्याच्या अंगावर ऐंशी जखमा होत्या असं चित्तोडची गाईड मला म्हणाली. जखमांचा अधिकृत स्कोअर मला कुठेही सापडला नाही. असो, पण शाळेनंतर मी राणा संगाला तसा विसरूनच गेलो होतो. तो पुन्हा डोक्यात आला २००५ साली एका कार्यक्रमात!

सचिन तेंडुलकरने पस्तीस शतकांचा विक्रम केला म्हणून लता दीदींच्या हस्ते त्याचा सत्कार मी दादरच्या यशवंत नाट्य मंदिरात आयोजित केला होता. सचिनच्या टेनिस एल्बोपासून विविध दुखापतींची चर्चा वर्तमानपत्रांत होत होती. त्यावेळी सचिनचं कौतुक करताना लतादीदी म्हणाल्या, ‘‘सचिन तुम्ही आमच्या संघाचे राणा संगा आहात. त्याला जशा अनेक जखमा होऊनही तो लढला. तसे तुम्ही लढत आहात.’’ लोकांनी टाळ्या मारल्या. दोघांमधली तुलना अत्यंत योग्य होती. लतादीदींच्या इतिहासाच्या ज्ञानाचं मला कौतुक वाटलं. अर्थात प्रेक्षकांतल्या किती मंडळींना राणा संगा आठवत होता देव जाणे! सचिनलाही शाळेत इतिहास वाचताना राणा संगा हे नाव कानावरून गेल्याचं स्मरत होतं की नाही, मला ठाऊक नाही.

माझ्या मनावर ते वाक्य कोरलं गेलं आणि चितोडला गेल्यावर राणा संगाच्या पाऊलखुणा मी शोधायला लागलो. ‘गाईड’ने एक मंदिर दाखवून शेवटी इथे त्याच्या जखमांवर उपचार झाले वगैरे सांगितलं. त्याने ज्या आत्मविश्‍वासाने सांगितलं ते पाहून जखमांनी विव्हळणारा राणा संगा आणि मागच्या जन्मात राजवैद्य असणारा गाईड डोळ्यांसमोर आले. खरं तर राणा संगा चित्तोडला परतला की नाही याचा उल्लेख नाही. पण असेलही कदाचित. पण गाईड मंडळींच्या वर्णनातली सत्यता ही चिंबोरीच्या आंगड्यामधल्या गराएवढी छोटी असते. पण असते टेस्टी! चित्तोडला गेलात तर आधी इतिहास वाचून जा. मगच ते बुरूज तुमच्यासमोर जिवंत होतील.

तुम्हाला राणा संगाच्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येईल आणि एक हात आणि डोळा गमावलेला लढवय्या राणा संगा डोळ्यांसमोर उभा राहील. कर्णावती ही त्याची तेजस्वी पत्नी तुम्हाला देवी भासेल. आयुष्यात फार लवकर लढाईत त्याने एक हात आणि डोळा गमावला. पण तरीही तो लढत राहिला. त्याला स्वातंत्र्ययोद्धा म्हणायला हरकत नाही. कारण तो परकीय आक्रमकांशी लढला. आधी इब्राहिम लोधीशी, जो अफगाण राजा होता आणि मग बाबराशी! त्याने लोधीला हरवलं. तो बाबराला हरवू शकला नाही कारण फितुरी! बाबराला त्याच्या देशात ‘परत जा’ हे सांगायला त्याने ज्या ‘सिलहादी’ या विश्‍वासू सरदाराला पाठवलं त्यानेच राणा संगाच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याने पक्ष सोडला, पक्षांतर केले. किती अनुवंशिक रोग हा आहे पहा. अजूनही उद्भवतोय. सिलहादीने येऊन राणा संगाला सांगितलं, ‘युद्ध अटळ आहे’ आणि ऐन युद्धाच्या वेळी तीस हजार सैन्याला घेऊन बाबराला मिळाला. परदेशी यवनांसाठी पायघड्या या अशा हिंदूंनीच घातल्या.

राणा संगा शर्थीने लढला. जखमी झाला. त्याच्या सैन्याला वाटलं तो धारातीर्थी पडला. त्यामुळे सैन्यात हलकल्लोळ माजला. बाबर जिंकला. बाबराने जिंकल्यावर पहिली गोष्ट काय केली असेल तर फितूर सिलहादीचा शिरच्छेद केला. त्यालाही ठाऊक होतं की, साप हा ठेचायचाच असतो. राणा संगा जखमांतून पुन्हा उभा राहिला. त्याने शपथ घेतली. बाबरला हरवल्याशिवाय चितोडवर पाय ठेवणार नाही. पण बाबराच्या तोफगोळ्यासमोर पुन्हा हरला. त्यानंतर काही वर्षांनी गुजरातच्या बहादूर शहासमोर कोसळणार्‍या चित्तोडमध्ये राणी कर्णावतीने शेकडो स्त्रियांसह दुसरा मोठा जोहार केला व तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येत असेल तर चितोडवर राजपूत स्त्रियांचा टाहो तुम्हाला स्पष्ट ऐकायला यायला हवा. नसाल तर चितोडवर बिअर-व्हिस्की शोधणारे लोकही भेटतात. राणा प्रताप हा राणा संगाचा नातू. तुम्हाला राणा प्रताप अनुभवायचा असेल तर तो चितोडवर अनुभवता येत नाही, तर नायद्वारापासून ११ मैल नैऋत्येला हळदीघाटात जायला हवे. गोगुंदा आणि खमणोर यांच्यामध्ये डोंगरांच्या ज्या बिकट आणि दुर्गम रांगा आहेत त्यातल्या एका अरुंद वाटेला हळदीघाट म्हणतात. जसं शिवाजी महाराजांचं शौर्य अनुभवायचं असेल तर सह्याद्री तुडवायला हवा, तसं राणा प्रताप अनुभवायला अरवलीपर्वत पालथा घालायला हवा.

तिथला प्रत्येक दगड तुम्हाला त्याच्या पराक्रमाची गाथा सांगतो. आता कारने जाताना तो घोड्यावरचा अनुभव येत नाही. पण इतिहासाचा हात नाही तरी बोट धरल्याचा अनुभव येतो आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटायला लागतो. शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांची कर्तबगारी ही स्वातंत्र्याची खरीखुरी व्याख्या आहे. राणा प्रतापचा राज्याभिषेक चितोडला झाला नाही. कारण चितोड अकबराकडे होते. तो कुंभलगढला झाला. त्यावेळी प्रताप बत्तीस वर्षांचा होता. अरवली पर्वतावरचा १०० मैल लांब आणि ६०-७० मैल रुंद एवढाच भूप्रदेश हे प्रतापचं राज्य होते. बाकी सर्व ठिकाणचे राजपूत राजे अकबराचे मांडलिक होते. अनेकांनी आपल्या तरण्या पोरी अकबराला आणि त्याच्या नातेवाईकांना नातेसंबंध जोडण्यासाठी दिल्या होत्या. राणा प्रताप गवतावर झोपला. कंदमुळं, फळं खाऊन जगला वगैरे कथा सर्वांनाच पाठ असतील. पण हळदीघाटीतून जाताना डोळ्यांसमोर इतिहासाच्या पुस्तकातलं ते चित्र उभं राहतं. तो हत्तीवर बसलेला मानसिंग, हत्तीच्या गंडस्थळापर्यंत पाय रोवून उभा असलेला चेतक घोडा आणि भाला फेकायच्या तयारीतला राणा प्रताप! माझ्यासाठी ते चित्र हा मूलभूत स्वातंत्र्याचा ध्वज आहे. तो मानसिंग राणा प्रतापला त्या अरवली पर्वताच्या जंगलात भेटायला आला तेव्हा त्याच्याबरोबर राणा प्रतापने जेवणही घेतलं नाही. मानसिंग ज्या जागी जेवायला बसला होता, त्या जागी गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून त्याने ती जागा पवित्र करून घेतली. त्या हळदीघाटीच्या लढाईत मानसिंग वाचला.

अनंत जखमांनी चेतकचा मृत्यू झाला. पण पुढे मानसिंगला प्रतापने पिटाळून लावलं. अकबराने प्रतापवर वारंवार सैन्य पाठवलं, पण प्रताप अजिंक्य राहिला. प्रतापच्या स्वातंत्र्यलालसेवर लुब्ध होऊन काही रजपूत राजे त्याला येऊन मिळाले. प्रताप हे स्वातंत्र्याचं दुसरं नाव बनले. एकदा अकबराने बिकानेरचा राठोड सरदार पृथ्वीराजला सांगितलं की, प्रताप शरण येतोय. तेव्हा बातमीतला खरेपणा जाणून घेण्यासाठी पृथ्वीराजने प्रतापला पत्र पाठवलं. त्यात लिहिले, ‘‘जर प्रताप अकबरला आपल्या तोंडाने बादशहा म्हणेल तर सूर्य पश्‍चिमेला उगवेल. मी आपल्या मिश्यांना पीळ देऊ की तलवारीने स्वत:च्या शरीरावर प्रहार करू.’’ प्रताप बादशहापुढे झुकणार नाही हा केवढा विश्‍वास होता त्याला! त्याला प्रतापने उत्तर दिलं. ‘‘या मुखातून अकबराचा तुर्क म्हणूनच उल्लेख होईल. सूर्य पूर्वेला उगवेल. जोपर्यंत प्रतापने आपली तलवार मोगलांच्या डोक्यावर धरली आहे तोपर्यंत खुशाल मिश्यांना पीळ द्या.’’ हे ऐकल्यावर आपले हातही नकळत आपल्या तुटपुंजा मिश्यांकडे जातात. मरेपर्यंत प्रतापने बराच मारवाड मुक्त केला. पण चितोड तो मुक्त करू शकला नाही. त्याच्या सरदारांनी त्याला वचन दिलं की, ‘‘आम्ही चितोड मुक्त करू.’’ तेव्हा त्याने प्राण सोडला.

चितोडहून मी उदयपूरला गेलो तेव्हा उदयपूरचं सर्व वैभव, ते भव्य महाल, त्यातली झुंबरं, ते डोळे दिपवणारं क्रिस्टल, मार्बलचा झगमगाट मला चितोडच्या भग्न अवशेषांपुढे क्षुद्र वाटायला लागला. स्वातंत्र्यातली मीठभाकरही पारतंत्र्यातल्या पक्वान्नापेक्षा चविष्ट असते हे चितोड दाखवतं. दिल्लीतल्या ‘हुकूमशाही’ला स्वातंत्र्याच्या काही ठिणग्या भस्मसात करू शकतात हा धडा प्रताप आणि पुढे मराठ्यांनी दिलाय. इतिहासातून शिकायचं असतं ते हेच!

आपली प्रतिक्रिया द्या