दिल्ली डायरी : उत्तर प्रदेशची वाटचाल कुठल्या दिशेने?

58

>>नीलेश कुलकर्णी

हरिद्वारच्या पवित्र गंगेच्या साक्षीने आणि काशी विश्वेश्वराला साक्षी ठेवून अखेर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रिंसह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली आहे. या दोन्ही राज्यांत प्रचंड बहुमताने भाजप सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी प्रचंड साठमारी होती. मात्र त्याला बळी न पडता भाजपने आपल्या केडरच्या कार्यकर्त्यांना संधी दिली हे विशेष. योगी आणि रावत यांच्या निमित्ताने भाजपने पहिल्यांदाच बहुसंख्याकांचे राजकारण केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या जोडीला केशवप्रसाद मौर्यांच्या रूपाने ओबीसी तर दिनेश शर्मांच्या रूपाने ब्राह्मण अशी दोन उपमुख्यमंत्र्यांची कुमकही देण्यात आली आहे. जनतेने बहुमताचे दान भाजपच्या पदरात टाकले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची पुढची वाटचाल विकासाच्या मार्गाने होते की हिंदुत्वाच्या हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणत भाजपने अखेर अजयिंसह ऊर्फ योगी आदित्यनाथ यांच्या नावावर उत्तर प्रदेश मुख्यमंत्रीपदाची मोहोर उमटवली. वास्तविक, आदित्यनाथ यांचे नाव सुरुवातीलाच कन्फर्म करण्यात आले होते, मात्र अखेरपर्यंत ते गुलदस्त्यात ठेवण्यात आले. राजनाथ सिंह यांच्यासारख्या कद्दावर नेत्याला मुख्यमंत्रीपदापासून रोखण्याचे यशस्वी डावपेचही मोदी-अमित शहा जोडीने खेळले. इकडे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या मनोज सिन्हांसारख्या नेत्यांनी अनेक ठिकाणी देवधर्म उरकूनही घेतले. मात्र `पुण्य’ पदरात पडले ते आदित्यनाथ यांच्या! पूर्वांचलमध्ये हिंदू मुलींना जाळ्यात पकडून `लव्ह जिहाद’ च्या नावाखाली सरेआम अत्याचार करणाऱ्यांविरोधात आदित्यनाथ यांनी मोठा संघर्ष पुकारला होता. हिंदू युवा वाहिनी ही त्यांची स्वत:ची अशी फौज आहे. त्या माध्यमातून आदित्यनाथ यांनी टगेखोरांना चांगलीच दहशत बसवली होती. उत्तर प्रदेशच्या प्रचारात त्यांनी झोकून दिले होते. त्याचा मोठा फायदा हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी झाला होता. त्याची बक्षिसी आदित्यनाथ यांना मिळाली. केशवप्रसाद मौर्या यांच्या रूपाने ओबीसी नेत्याला उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली. त्यांचीही मेहनत फळाला आली. दिनेश शर्मा हे लखनौचे माजी महापौर. पंतप्रधानांचे `ब्ल्यू आइड बॉय’ असल्यामुळे त्यांची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लागली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत माफियाराज, गुंडाराज आणि जातीवाद हद्दपार करू असे आश्वासन भाजपने दिले होते. आता या गुंडाराजची वळकटी करून योगींना ती गंगेत विधिवत विसर्जित करावी लागेल. योगींच्या यशापयशावर पुढील लोकसभा निवडणुकीतील भाजपचे भवितव्यही अवलंबून असेल त्यामुळेच योगींना मोठ्या कसोटीला उतरावे लागणार आहे. हिंदुत्वाचा फायरब्रॅण्ड नेता ही पुण्याई गाठीशी असली तरी त्यांना स्वत:ला प्रशासक म्हणून सिद्ध करावे लागेल. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर योगींना पूर्वांचलबरोबरच पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या मध्य भागामध्येही मोठी स्वीकारार्हता आहे. हाच योगींचा प्लस पॉइंट ठरला. त्यामुळेच त्यांचा ‘योगी ते राजयोगी’ असा प्रवास सुकर झाला. दुसरीकडे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अमित शहांसोबत उत्तर प्रदेशात काम करणाऱ्या त्रिवेद्रिंसह रावत यांना उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. या त्रिवेंद्रांचे लग्न बाबरी पाडल्यानंतर लगेच होते. अक्षरक्ष: कफ्र्यूमध्ये त्यांना आपले शुभमंगल सावधान उरकावे लागले होते. त्यामुळे खुशी के लड्डू त्यावेळी ना त्यांना आनंदाने खाता आले ना वऱ्हाडी मंडळींना खिलवता आले. मात्र आता हेच त्रिवेंद्र मुख्यमंत्री बनल्याने ‘दोनो हातों मे लड्डू’ अशी परिस्थिती आहे. प्रशासनाचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना आणि प्रचंड बहुमत पाठीशी असताना योगी आणि त्रिवेंद्रिंसह रावत कसा कारभार करतात हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या