आयुष्यात एकदा तरी शनिची साडेसाती यावी!

anupriya-desai

>>अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तू विशारद

शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी.व्ही. वर शनिबद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून अनेकदा शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब अशी माहिती दिली जाते, त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव वगैरे, म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते. पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक, न्याय देणारा, आध्यात्मिक, सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दुसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही.

ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा ग्रह आहे. शनि मकर व कुंभ राशींचा अधिपती असून त्याची आवडती रास कुंभ आहे. शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पूर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. शनिच्या प्रभावाने आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी विलंबाने घडतात. पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची, दीर्घोद्योगाची चिकाटी शनिजवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन, सूत्रबद्धता, सुसंगतता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी, दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो कारण ह्यासाठी लागणारा संयम आणि सातत्य शनिकडेच आहे. आणि तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते.

शुक्र, चंद्र, सूर्य, गुरु, बुध इत्यादी ग्रहांची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही? त्यांच्याबद्दल नेहेमी चांगलेच वाचत आलो आहोत आपण. हे ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत. कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे.

साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास, आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शनिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनिला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात. म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे, त्याच्या आधीची राशी आहे कर्क आणि सिंह राशीनंतर येते कन्या. जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशींना साडेसाती सुरू असते.

पण साडेसातीचाही खूप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे… पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने आणि सातत्याने काम करते, खोटे बोलत नाही, आळस करत नाही न्यायाने वागते, त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे. खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते. मग ह्यावर उपाय काय?

उपाय:

साडेसातीचा त्रास होतो म्हणजे नेमके काय होते? ह्याचे उदाहरण द्यायचे झाले तर असे की, समजा तुमची साडेसाती सुरू आहे आणि ह्याच काळात तुम्ही एका नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी गेला आहात. इंटरव्ह्यू छान झाला आहे आणि तुम्हाला नोकरी मिळण्याची खात्रीच आहे. परंतु ठराविक काळानंतरही कंपनीकडून काहीच कळवण्यात आले नाही तर तुम्ही अस्वस्थ होता. अस्वस्थतेनंतर निराशा येते. आणि मग तुम्ही साडेसाती आणि शनिला दोष देऊ लागता. मुळात साडेसाती ही तुम्हांला संयम म्हणजेच Patience शिकवण्यासाठीच आहे. सातत्य ठेवल्याने आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण कशी साधू शकतो हे साडेसातीतच कळते.

साडेसातीत बऱ्याच लोकांचे भले झाले आहे, शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झाली आहे, मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत. ह्याचबरोबरीने अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो. जेंव्हा साडेसातीची सुरुवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून. ह्याच वेळी खऱ्या अर्थाने आपली माणसे कोणती. मदतीचा हात अपेक्षित असताना ऐनवेळी आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते. म्हणून मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खऱ्या माणसांची ओळख पटावी.

अधिक माहितीसाठी संपर्क करा… [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या