5 हजारांवर नागरिकांचा बळी! 25 हजार जखमी ; तुर्कस्तान–सीरियात  मृत्यूचे तांडव

विध्वंसकारी भूकंपाने तुर्कस्तान,   सीरियात मृत्यूचे तांडव सुरू असून, बळींची संख्या पाच हजारांवर गेली आहे. 25 हजारांवर नागरिक जखमी झाले आहेत तर, हजारो इमारती जमीनदोस्त झाल्यामुळे लोकांना निवारा राहिलेला नाही. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या तुर्कस्तान आणि सीरियाला मदतीसाठी हिंदुस्थान, अमेरिकासह जगभरातील अनेक देश सरसावले आहेत.

तुर्कस्तानात केंद्रबिंदू असलेल्या 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या तीन धक्क्याने प्रचंड जिवीत आणि वित्तीय हानी केली. तुर्कस्तानात 4 हजारांवर नागरिक मृत्युमूखी पडले तर सीरियात मृतांची संख्या एक हजारांवर गेली आहे. किमान 25 हजार नागरिक जखमी झाले आहेत. सहा हजारांवर इमारती जमीनदोस्त झाल्या. ढिगाऱयाखाली अद्याप शेकडो नागरिक अडकले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

  हिंदुस्थानने तुर्कस्तानला मदत पाठविली आहे. मदत घेऊन एअर इंडियाची दोन विमाने तुर्कस्तानला दाखल झाली आहेत. दरम्यान, पाकिस्तानने या हिंदुस्थानी विमानांना एअर स्पेस परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे.

मृतांची संख्या आठ पटीने वाढण्याची भीती

 भूकंपाची तीव्रता आणि झालेली प्रचंड हानी पाहता मृतांची संख्या आठ पटीने वाढू शकते, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या अंदाजानुसार मृतांची संख्या 40 हजार होण्याची भीती आहे.

 बर्फवृष्टी, पाऊस सुरू आहे. तापमानातील या बदलाचा परिणाम मदतकार्यात होत आहे. ढिगारे उपसण्याच्या कामात अडथळा येत आहे. यामुळेही मृतांची संख्या वाढू शकते. दरम्यान, 1939 साली तुर्कस्तानात असाच 7.8 रिश्टर स्केलचा भूपंप आला होता. त्यात 33 हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला होता.