धक्कादायक! अमेरिकेत उद्योगपती बिर्ला यांच्या कुटुंबासोबत वर्णद्वेष

अमेरिकेतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गायिका अनन्या बिर्ला आणि तिच्या पुटुंबीयांना वर्णद्वेषाला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक घटना घडली. रेस्टॉरंटमधून अनन्या आणि तिची आई आणि भावाला बाहेर काढण्यात आले. अन्यया ही हिंदुस्थानचे प्रसिद्ध उद्योगपती आदित्या बिर्ला ग्रूपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे.

अनन्या बिर्ला हिने घटनेची माहिती ट्विटरवरून सांगितली. वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रुट्स रेस्टॉरंटमध्ये वर्णद्वेषाचा प्रकार घडला.

अनन्यासह तिची आई नीरजा आणि भाऊ आर्यमन यानेही घटनेबद्दल ट्विट केले. ‘हे खूप अपमानास्पद आहे. तुम्हाला कोणासोबतही असे वागण्याचा अधिकार नाही,’ असे नीरजा बिर्ला यांनी म्हटलंय. तर आर्यमनने लिहिलंय, माझ्यासोबत असा प्रकार कधीच झाला नव्हता. या घटनेमुळे माझा विश्वास बसला की वर्णद्वेष खरोखरच केला जातो.

ट्विटरवरून हा प्रकार उघड होताच लोकांनी संताप व्यक्त करत रेस्टॉरंटवर टीका करायला सुरुवात केली. काहींनी बिर्ला कुटुंबाला रेस्टॉरंट विकत घेण्याचा सल।ा दिला. अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी वर्णद्वेषातून जॉज फ्लॉईड याच्या मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर अमेरिकेत मोठे आंदोलन उभे राहिले होते.

हे रेस्टॉरंट सेलिब्रेटी शेफ अॅटोनियो लोफासा याचे आहे. अॅटोनियो लोफासाला ट्विट करत अनन्याने म्हटलंय, आम्हाला जेवणासाठी तीन तास वाट पाहावी लागली. माझ्या आईला एका वेटरने वाईट वागणूक दिली. वर्णद्वेषी टीका केली.
रेस्टारंटने आरोप फेटाळले

बिर्ला पुटुंबाला रेस्टॉरंटच्या बाहेर काढल्याचा आरोप रेस्टॉरंटचे पार्टनर पाब्लो मोइक्स यांनी फेटाळला. नियमांप्रमाणे मद्य देण्यासाठी आम्ही ओळखपत्राची विचारणा केली. त्यावरून बाचाबाची झाली. तीन जणांपैकी दोघांकडे ओळखपत्र होते तर तिसऱया व्यक्तीकडे केवळ झेरॉक्स होती. मात्र त्यानंतर सर्व व्यवस्थित झाले आणि ते सर्व भोजन करून निघून गेले. आमच्या वेटर आणि जेवणाची प्रशंसाही त्यांनी केली, असे पाब्लो मोईक्स यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या