रेकॉर्डवरील गुन्हेगार अबू बकर चाऊसची हत्या

रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अबू बकर चाऊस याचे दोन्ही डोळे फोडून निर्घृण हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी जळगाव महामार्गावरील नारेगाव वळणावर उघडकीस आली. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

जळगाव रोडवरील नारेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडलेली असल्याची माहिती रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल पोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेह कोणाचा आहे. याचा शोध पोलिसांनी सुरू करताच टाइम्स कॉलनीत राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अबू बकर चाऊस (38) याचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळी पथके स्थापन केली होती.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अबू बकर चाऊस, अल्तमश कॉलनीतील सय्यद समीर ऊर्फ स्टायलो सय्यद शौकत (25) हे दोघेजण रात्री दीड वाजेपर्यंत आंबेडकर चौकातील एका हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. तेथून ते नारेगावच्या दिशेने जात असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे स्टायलो समीर याने रागाच्या भरात अबू बकर चाऊस याचा निर्घृणखून करून मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.