‘इसिस’चा म्होरक्या बगदादीचा खात्मा, अमेरिकेची सीरियात कारवाई

543
baghdadi

अमेरिकेवर हल्ला करणाऱया ‘अल कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादनेला पाकिस्तानमध्ये घुसून मारल्यानंतर आता अमेरिकेने सीरियात घुसून इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याचा खात्मा केला आहे. अमेरिकेच्या स्पेशल कमांडोंनी काल रात्री ही कारवाई केली. बगदादीविरोधातील कारवाईत अमेरिकेला सिरिया, इराक, तुर्कस्थान आणि रशियाने मदत केली तर सिरियन खुर्द बंडखोरांनी बगदादीची खबर अमेरिकेला दिली. त्याच्यावर अडीच कोटींचे बक्षीस होते.

बगदादी ठार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी ‘काहीतरी मोठे घडले आहे’ असे ट्विट केले. मात्र, त्यांनी बगदादीचे थेट नाव घेतले नव्हते. त्यामुळे बगदादी ठार झाला आहे, याला दुजोरा मिळत नव्हता. मात्र, ट्रम्प यांनी रात्री तो ठार झाल्याची घोषणा केली.

स्फोटकाने स्वतःला उडवून दिले

अमेरिकी कमांडोने घेरल्याचे लक्षात आल्यानंतर बगदादीने आपल्या तीन मुलांसह बंकरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या आधी त्याने त्याच्या दोघा पत्नींची हत्या केली. त्याला बंकरमधून बाहेर पडायला रस्ता सापडला नाही. त्यामुळे बंकरच्या शेवटी स्वतःसह मुलांनाही स्फोटकाने उडवून दिले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना कमांडोजने टिपले.

बगदादी कुत्र्यासारखा मेला – डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री बगदादी ठार झाल्याच्या वृत्ताला पत्रकार परिषद बोलवून दुजोरा दिला. ट्रम्प म्हणाले, ‘गेली तीन वर्षे अमेरिकी गुप्तचर संघटना त्याच्या मागावर होती. त्याला पकडणे किंवा ठार मारणे हीच माझ्या सरकारची प्रमुख नीती होती. शेवटी बगदादीच्या पापाचा घडा भरला होता. मानवतेचा शत्रू आणि जगातील सर्वात क्रूर अशा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बगदादी ठार झाला. इतरांना अत्यंत निर्दयपणे मारणारा बगदादी स्वतः मात्र घाबरट निघाला. अमेरिकेच्या कमांडोंनी घेरले असल्याचे लक्षात आल्यावर त्याने स्वतःला मुलांसह स्फोटकाने उडवून दिले. तो कुत्र्यासारखा मेला.’

‘डीएनए’ चाचणीनंतर घोषणा

बगदादीने काल रात्री स्वतःला स्फोटकाने उडवून दिल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. त्यासाठी एक दिवस लागला. आज रात्री ही चाचणी जुळल्यानंतर ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याची घोषणा अमेरिकेने केली.

कुठे केली कारवाई

अमेरिकेच्या कमांडोजने सिरियातील पश्चिम भागात बंकरमध्ये लपून बसलेल्या बगदादीवर कारवाई केली. बंकरमध्ये बगदादी, त्याची तीन मुले आणि त्याचे साथीदार होते.

कारवाईचे थेट प्रक्षेपण व्हाईट हाऊसमध्ये

डोनाल्ड ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊसमध्ये बसून एखाद्या चित्रपटासारखी बगदादीवरील कारवाई थेट पाहिली. त्यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि लष्करातील मोठे अधिकारी उपस्थित होते.

अबूबकर अल बगदादी

बगदादीने 2006मध्ये ‘अल कायदा’च्या एका गटाला वेगळे करून स्वतःची दहशतवादी संघटना बनवून त्याला ‘बगदादी अल कायदा’ असे नाव दिले. 2013मध्ये या संघटनेचे नाव बदलून त्याने इसिस ठेवले. त्यानंतर त्याने इराक आणि सिरियावर आक्रमण करून अनेक भाग ताब्यात घेतले. या ताब्यात घेतलेल्या प्रदेशाला त्याने इस्लामी राष्ट्र (इस्लामी स्टेट) घोषित केले. इस्लाम न मानणाऱयांचे, इसिसमध्ये सामील न होणाऱयांचे सामूहिक हत्याकांड करणे तसेच अमेरिकन, ब्रिटिश नागरिकांचे अपहरण आणि हत्या यासाठी बगदादी कुप्रसिद्ध होता.

आपली प्रतिक्रिया द्या