रूग्णवाहिकाचालकाकडून रूग्णाच्या मुलीचा विनयभंग

रूग्णवाहिकाचालकाने रूग्णाच्या मुलीचा विनयभंग केला, तसेच रूग्णास खाली उतरवण्याची धमकी देऊन 14 हजार रूपये जादा उकळले. याप्रकरणी रूग्णवाहिकाचालकास गजाआड करण्यात आले आहे. हि घटना 25 एप्रिल रोजी घडली.किशोर शंकर पाटील ( वय45, रा. केशव अपार्टमेंट, साई चौक, नवी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच इतर सातजणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 22 वर्षीय तरूणीने गुरूवारी (दि.6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी ही स्वत:च्या आईला वायसीएम रूग्णालयातून थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारांकरिता 25 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ‘एमएच-31 सीक्यू-6797’ या रुग्णवाहिकेतून निघाली. रस्त्यातच रूग्णवाहिकेतून रुग्णास खाली उतरविल्यास जिवाला धोका होईल, अशी भीती दाखवून रूग्णवाहिकाचालकाने तरूणीकडून जादा पैसे उकळले. तसेच फिर्यादी तरूणीकडे वाईट नजरेने पाहून पैसे घेताना तिच्या हातालाही स्पर्श केला. त्यावेळी फिर्यादी यांनी हात झटकला असता, ’चार आणे की मुलगी, बारा आणे का मसाला’ असे बोलून तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या