मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचे सारथ्य महिला करणार

263

मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्याने तिचा ‘फर्स्ट लूक’ मंगळवारी प्रसारमाध्यमांना दाखविण्यात आला. ही लोकल लवकरच सेवेत येणार असली तरी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर की ट्रान्सहार्बर यापैकी कोणत्या कॉरिडॉरमध्ये ती धावणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या एसी लोकलच्या पहिल्या फेरीचे सारथ्य महिला मोटरवुमनच्या हाती सोपविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये पहिली एसी लोकल सोमवारी दाखल झाली आहे. या लोकलची बांधणी चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात झाली असून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स अर्थात ‘भेल’ने केली असून अशा सहा एसी लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत. तीन वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झालेली पहिली लोकलही ‘भेल’ कंपनीचीच असल्याने या लोकलच्या केवळ बेसिक चाचण्या घेण्यात येणार असून लवकरच ती मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणार आहे. या लोकलचा मार्ग अद्याप निश्चित झाला नसून प्रवासी संघटनांशी चर्चा केल्यानंतर त्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली.

मध्य रेल्वेची एसी लोकल लवकर धावणार असून तिच्या पाठोपाठ दुसरी एसी लोकल 31 मार्चपर्यंत येणार असून वर्षअखेरपर्यंत उर्वरित चार एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील, असे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पहिली ईएमयू लोकल 1925 साली याच कुर्ला कारशेडमध्ये आली होती आणि आता मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचे उद्घाटनही याच कारशेडमधून होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

थोडी बुटकी लोकल…

तीन वर्षांपूर्वी देशातील पहिली उपनगरीय वातानुकूलित लोकल मध्य रेल्वेवर दाखल करण्यात आली होती, परंतु तिची उंची (4283 एम.एम.)जास्त असल्याने मध्य रेल्वेच्या ब्रिटिशकालीन पुलांच्या उंचीमुळे तिला पश्चिम रेल्वेच्या स्वाधीन करण्यात आले. मध्य रेल्वेने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलचे प्रशिक्षण दिले असून तिला आलेल्या संभाव्य अडचणींचा अभ्यास केला आहे. आता मध्य रेल्वेच्या गरजेनुसार 4270 एम.एम. इतकी कमी उंचीची लोकल पुरविण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.

एसी लोकलची वैशिष्टय़े…

या एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात 15 टन क्षमतेचे दोन एसी बसविण्यात आले आहेत. संपूर्ण स्टेनलेस स्टीलची बांधणी असलेल्या या लोकलची आसनेही स्टेनलेस स्टीलची आहेत. या लोकलचे स्वयंचलित उघड-बंद होणाऱ्या दरवाजांचे नियंत्रण गार्डकडे असून सहा सेकंदांत हे दरवाजे बंद होणार असून त्यांना अलार्म इंडिकेटर बसविण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत प्रत्येक डब्यात प्रवाशांना गार्डशी संपर्क साधण्यासाठी चार ‘टॉकबॅक’ सिस्टीमची सोय आहे. अलीकडे ही गाडी ट्रान्सहार्बरवर चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. या गाडीची क्षमता 1,028 बसलेले तर 4,936 उभे अशी एकूण 5,964 प्रवाशांची आहे. तर गाडीचे भाडे फर्स्ट क्लासच्या 1.3 पट इतके आहे.

आपली प्रतिक्रिया द्या