एसी लोकल सुट्टीच्या दिवशीही धावणार

401

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल आता या आठवडय़ापासून शनिवार आणि रविवार अशी विकेंडलादेखील धावणार असल्याने सुट्टीचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास थंडा थंडा कुल कुल होणार आहे. पश्चिम रेल्वेवर अलीकडेच नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून रेल्वेमंत्र्यांनीही स्पेअर लोकल उपलब्ध झाल्याने मेंटेनन्सची अडचण दूर झाल्याने शनिवार आणि रविवारदेखील एसी लोकल चालवा असे आदेश दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकलमुळे विकेण्डला मुंबई दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांचाही फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या चर्चगेट ते विरारदरम्यान वातानुकूलित लोकलच्या दिवसाला 12 फेऱ्या होत आहेत. अलीकडेच पश्चिम रेल्वेवर सर्व यंत्रणा तळाशी बसवलेली नवीन वातानुकूलित लोकल दाखल झाली होती. त्यानंतर तिसरी एसी लोकलही पश्चिम रेल्वेला मिळणार असल्याने पहिल्या वातानुकूलित लोकलला मेंटेनन्ससाठी कारखान्यात रवाना करण्यात आले आहे. सध्या नवीन आलेल्या वातानुकूलित लोकलच्या पश्चिम रेल्वेवर फेऱ्या होत आहेत. या नव्या तंत्राच्या एसी लोकलच्या तळाशी विद्युत यंत्रणा व उपकरणे असल्याने शनिवार-रविवारच्या जादा फेऱ्यांमुळे त्यांच्याही चाचण्या घेण्यास मदत होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या