मुंबईत १ जानेवारीपासून लोकलमध्ये ‘गारवा’, रेल्वे मंत्र्यांची घोषणा

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ जानेवारीपासून मुंबईमध्ये ए.सी. लोकल धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी केली. सुरूवातीला लोकलचे १ किंवा दोन २ ए. सी.  डबे असतील. आणि त्यानंतर हळूहळू लोकलचे सर्व डबे ए.सी. करण्यात येतील, असे गोयल म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गोलय यांनी पत्रकार परिषदेमध्ये रेल्वे संदर्भात अन्यही काही घोषणा केल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा सुरक्षिततेचा आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशन्सवर सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येईल. तसेच हे सीसीटीव्ही जवळच्या पोलीस स्थानकांशी जोडले जातील असे गोयल यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या दृष्टीने अनेक सुधारणा करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवर देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा वाढविण्यात येतील. ट्रेन आणि स्टेशन्सवर सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येणार आहे. देशभरातल्या ३ हजार रेल्वे स्टेशन्सवर स्वयंचलित जीने बसवण्यात येतील ज्याचा फायदा दिव्यांग आणि वृद्ध प्रवाशांना होईल असेही गोयल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या