बीडच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

158

सामना प्रतिनिधी । बीड

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या जिल्हा पुरवठा खात्याचा अखेर पर्दाफाश झाला. दस्तुरखुद्द जिल्हा पुरवठा अधिकारीच एका कारकूनासह एक लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ जेरबंद झाला. या घटनेने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा पुरवठा विभागामध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. भ्रष्टाचाराचा अड्डा झालेल्या पुरवठा विभागात थेट पैशाची मागणी केली जाते. सामान्य नागरिकांना अडवण्याचे काम पुरवठा विभागात केले जाते. पुरवठा विभागाच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र मोठ्या हुशारीने कार्यालयातील प्रशासन सर्व बाबी हाताळत होते. आज अखेर या खात्याच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला. जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके आणि क्लार्क फड यांना एका प्रकरणामध्ये एक लाख रूपयाची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडेसह विकास मुंडे, दादासाहेब केदार, राकेश ठाकुर, प्रदीप वीर, अमोल बागलाने यांनी फत्ते केली. लाच घेताना वरिष्ठ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडताच प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या