
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
एका कापड व्यापाऱ्याला पाच वर्षांपूर्वीच्या रिटर्नमधील ४६ लाखांच्या दंडाची रक्कम माफ करण्यासाठी दोन लाखांची लाच घेताना आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे याला पुण्यावरून सीबीआयच्या विशेष पथकाने संभाजीनगरात अटक केली. ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी कोठावदेला न्यायालयीन कोठडी सुनावली. लाचखोर अधिकारी सध्या हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने लाचखोर अधिकाऱ्याच्या संभाजीनगर आणि नाशिक येथील घरांवर छापे मारून लाखो रुपयांचे घबाड जप्त केले आहे.
गुरुगोविंदसिंगपुऱ्यातील व्यापारी गुरप्रीतसिंग महेंद्रसिंग जग्गी यांचा शहरात कपड्याचा होलसेल व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवहाराचे विवरण त्यांनी आयकर विभागाला दिले, पण सिडको भागातील आयकर कार्यालयातील वॉर्ड क्र. ३ (१) चा आयकर अधिकारी कोठावदेने त्यांच्या व्यवहारावर संशय व्यक्त केला. २०१० व २०११ या साली जग्गी यांच्यावर ४६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. लावलेला दंड कमी करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी आयकर अधिकारी कोठावदे याने दोन लाखांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने जग्गी यांनी पुणे येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला व अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार दिली.
गुरुवारी सायंकाळी कोठावदे यास सिडकोमधील आयकर विभागाच्या कार्यालयात दोन लाखांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अटक केल्यानंतर त्याच्या संभाजीनगर आणि नाशिक येथील घरांवर छापे टाकून या संबंधीची कागदपत्रे जप्त केली आहेत. यात लाखो रुपयांचे घबाड अधिकाऱ्यांच्या हाती लागले. सीबीआय पोलिसांनी विशेष न्यायालयासमोर कोठावदेला हजर केले. सीबीआयचे विशेष वकील डी. एन. म्हस्के यांनी सखोल तपास करून आरोपीच्या संपत्तीची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर कोठावदेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.