पालघर रेल्वे पोलिसांच्या दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक

पालघर लोहमार्ग (रेल्वे) पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पालघर एसीबीच्या पथकाने 10 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकावर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत पालघर लोहमार्ग पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली असून याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर लोहमार्ग पोलिसांचे पोलीस नाईक अकिल पठाण व पोलीस शिपाई समाधान नरवाडे यांनी रेल्वेत प्रतिबंधित गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या इसमांना पकडले होते. परंतु  कारवाई न करण्यासाठी तसेच पुढेही प्रतिबंधित गुटख्यांची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दर महिना हप्ता म्हणून 10 हजार रुपयांची मागणी केली होती. सदरची कारवाई एसीबीचे उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी आपल्या पथकासह केली असून या कारवाईत पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, हवालदार अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दीपक सुमडा सामील होते.