एसीबीकडे महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे पुरावे नाहीत? तपासावर प्रश्नचिन्ह

54

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेली दोन वर्षं महाराष्ट्र सदन प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भष्ट्राचार विरोधी विभागाकडे (एसीबी) घोटाळ्याचा पुरावा असलेली कागदपत्रे नसल्याचं समोर येत आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याच्या प्रकरणात भष्ट्राचार विरोधी पथकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि विकासक प्रसन्न चमणकर यांच्यावर ठपका ठेवला आहे. पण, ज्या कागदपत्रांच्या पुराव्यावर हा ठपका ठेवण्यात आला, ती कागदपत्रे विभागाकडे उपलब्ध नाहीत. एका इंग्रजी वृत्तपत्राने या संबंधीचं वृत्त दिलं आहे.

या प्रकरणात विकासक असलेल्या चमणकर यांनी एसीबीकडे १६ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणातील व्यवहारांच्या फाईल्सची मागणी केली होती. याशिवाय सदनाच्या बांधकामासाठी मागवण्यात आलेल्या विकासकांच्या निविदा तसंच सिरमूर येथील जागेच्या ट्रान्सफरची कागदपत्रं मागितली होती. या कागदपत्रांच्या प्रती मागवल्यानंतर एसीबी या कागदपत्रांसंबंधी काहीही माहिती न देऊ शकल्यामुळे चमणकर यांनी मुख्य माहिती अधिकारी अजित कुमार जैन यांच्याकडे धाव घेतली. जैन यांनी १ जानेवारी २०१८ रोजी एसीबीला या कागदपत्रांसंबंधी विचारणा केली असता हे दस्तावेज एसीबीकडे उपलब्ध नसल्याचं विभागाने स्पष्ट केलं, असं या वृत्तात म्हटलं आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप ज्या दिल्ली येथील सिरमूर प्लॉटपासून सुरू झाला, त्याच्या ट्रान्सफरचे कोणतेही दस्तावेज एसीबीकडे नाहीत. जर असे कोणतेही दस्तावेज एसीबीकडे नसतील तर कोणत्या पुराव्यावर एसीबीने भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला? असा प्रश्न चमणकर यांनी उपस्थित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या