रेतीचे ट्रक सोडण्यासाठी २ लाखांची लाच मागणाऱ्या IPS अधिकाऱ्यावर गुन्हा

19

सामना प्रतिनिधी । नांदेड

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वाळूचा ट्रक सोडविण्यासाठी आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक जी.विजय कृष्णन यादव यांच्या सांगण्यावरुन एका खासगी इसमाला एक लाख रुपयांची लाच घेताना मंगळवारी अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने दुपारी चार वाजता इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगेहात पकडले.

यापूर्वी अमरावती येथे कार्यरत असलेल्या व सध्या इतवारा उपविभागाचा पदभार असलेल्या सहायक पोलीस अधीक्षक जी. विजय कृष्णन यादव यांनी रेती माफियाविरुध्द अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्यातंर्गत देखील याबाबत कारवाई झाली होती. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आरोपीला अटक न करणे व त्याचा ट्रक सोडणे तसेच त्याच्याविरुध्द चार्जशिट दाखल न करणे याबाबत बोलणी झाली होती. यादव यांनी यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता एक लाख रुपये द्यायचा होता. आज इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय कृष्णन यादव यांच्या सांगण्यावरुन सन्नीसिंघ इंदरसिंघ बुंगई रा.बाबादिपसिंघनगर भगतसिंघ रोड नांदेड याने एक लक्ष रुपयांची लाच सदरच्या तक्रारदाराकडून घेतले. याबाबत अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सदरच्या तक्रारदाराने लेखी तक्रार देवून आपल्याला हे मान्य नसल्याचे कळविले होते. त्याबाबतचे सर्व पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जमवले होते. आज दुपारी यादव यांच्या वतीने सन्नीसिंघ इंदरसिंघ यांनी ही लाच स्वीकारल्यानंतर अमरावतीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. आपण ही लाच यादव यांच्या सांगण्यावरुन स्विकारल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत इतवारा पोलिसांनी आरोपी जी. विजय कृष्णन यादव आणि सन्नीसिंघ बुंगई यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. सन्नीसिंघ बुंगई यांना अटक करण्यात आली असून, यादव हे सध्या बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याविरुध्द लाच घेताना गुन्हा नोंदविण्याचा हा पहिलाच प्रकार मराठवाड्यात घडला असून, या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नांदेडच्या पोलीस दलाला व संबंधित यंत्रणेला कुठलीही माहिती न देता अमरावती विभागाने ही धडाकेबाज कामगिरी केल्याचे वृत आहे

आपली प्रतिक्रिया द्या